संस्कृत भाषेच्या पुन:जागरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Last Updated by संपादक

रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आयोजित ऑनलाईन संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन

नागपूर : संस्कृत भाषा ही जगातील सर्व भाषांची जननी आहे. सर्व विषयांच्या ज्ञानाचे उगमस्थान असलेल्या या जगतजननीच्या पुन:जागरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल तथा कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले.

रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे ‘ऑनलाईन संस्कृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करताना श्री. कोश्यारी बोलत होते.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे माजी कुलगुरु प्रो. व्ही. कुटुंबशास्त्री, ‘संभाषण संदेश’चे संपादक डॉ. जनार्दन हेडगे, विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रो. विजयकुमार यावेळी उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात श्री. कोश्यारी म्हणाले, भारतीय साहित्यात महाकवी कालिदास यांचे महत्त्व सर्वात श्रेष्ठस्थानी आहे. संस्कृतचे केवळ भाषा ज्ञान असणे पुरेसे नाही. तर या भाषेतील विविध शास्त्रांचे ज्ञानही आत्मसात करणे गरजेचे आहे. संस्कृत भाषेच्या अध्ययनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. भाषा, संस्कार, विचार, संस्कृती, कला, विज्ञान, विविध शास्त्रांचे ज्ञान या भाषेत आहे. संस्कृत ही ‘सर्वजनभाषा’ झाली पाहिजे. या भाषेच्या विकासासाठी धोरण आखणे गरजेचे आहे. संस्कृत भारतीसारख्या संस्था सरल संस्कृत संभाषणाचे प्रशिक्षण देतात. संभाषणाशिवाय भाषेचे अस्तित्व नसते. जीवनात संस्कृत अध्ययन व संभाषण हे व्रत म्हणून स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विश्वविद्यालयातर्फे जानेवारी 2020 मध्ये झालेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचा शतकोत्सव आणि सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचा अहवाल ‘ए डिजिटल बुक ऑन द फिफ्टीन ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, नागपूर’ या ग्रंथाचे प्रकाशन श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांनी देखील संस्कृत भाषेचे महत्त्व त्या काळात जाणले होते. राज्य शासनाचा संस्कृत विद्यापीठांच्या सर्व योजनांना पाठिंबा आहे. तसेच विद्यार्थी व समाजापर्यंत संस्कृत भाषा अधिकाधिक पोहचावी, यासाठी ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारा’ची थांबलेली प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन प्रथमच ऑनलाईन करण्यात आले. या उद्घाटन समारंभात सुमारे दोनशेहून अधिक संस्था तसेच संस्कृत भाषिक विद्यार्थी, एक हजाराहून अधिक संस्कृतप्रेमी ऑनलाईन सहभागी झाले होते.

हा महोत्सव 3 सप्टेंबरपर्यंत चालणार असून या कालावधीत महाराष्ट्रातील विविध संस्था तसेच विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषेवर आधारित स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.

संस्कृत महोत्सवाच्या उद्घाटनानंतर राज्यपालांच्या हस्ते ‘ सायन्स इन संस्कृत’ या ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘प्राच्यविद्यावाचस्पती’ या उपाधीने प्रो. व्ही. कुटुंबशास्त्री यांना सन्मानित करण्यात आले. संस्कृत भारतीतर्फे गेल्या 25 वर्षांपासून प्रकाशित होणाऱ्या ‘गीर्वाणवाणीसमर्यापुरस्कार’ या संस्कृत पत्रिकेला संस्कृत सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संस्कृत भारतीमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘संस्कृते विज्ञानम्’ या प्रदर्शनीचे लोकार्पण करण्यात आले.

प्रास्ताविकात श्री. वरखेडी यांनी विश्वविद्यालयातर्फे आयोजित संस्कृत महोत्सवाविषयी माहिती दिली. देशातील संस्था, विद्यापीठे आणि संस्कृतप्रेमींना जोडणे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बाला अय्यर, जीओ मीट विस्तार सेवा मंडळाचे संचालक प्रो. कृष्णकुमार पांडेय, राज्य समन्वयक डॉ. प्रसाद गोखले, विविध विद्यापीठांचे कुलगुरु, अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सांस्कृतिक नजराणा म्हणून महाकवी कालिदासांच्या ‘गीत मेघदूतम’ खंडकाव्यातील निवडक श्लोकांचे निरुपण आणि गायन प्राची जांभेकर, धनश्री शेजवलकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी सादर केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिनकर मराठे व डॉ. रेणुका बोकारे यांनी तर प्रो. विजयकुमार यांनी आभार मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.