ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार नवीन रुग्णवाहिका
अमरावती, दि. ४ : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पाचशे नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. मेळघाटसह जिल्ह्यात आवश्यक तिथे रुग्णवाहिका उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने वेळोवेळी पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी नव्या इमारतीची उभारणी, नवी साधनसामग्री यासह जुन्या रुग्णवाहिका बदलून नव्या रूग्णवाहिकांची उपलब्धता यासाठी विविध स्तरावर निर्णय होत आहेत. कोरोना संकटकाळात जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोविड रूग्णालय, स्थानिक स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळा, तालुका स्तरावर कोविड केअर सेंटर यांच्या निर्मितीप्रमाणेच ग्रामीण भागातील रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका बदलण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नवीन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार आहे. यानुसार आवश्यक साधनसामग्री प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा स्तरावरून शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच मेळघाटातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
रुग्णवाहिकांप्रमाणेच मनुष्यबळ उपलब्धता, इमारत दुरुस्ती, साधनसामग्री याबाबतही सविस्तर आढावा घेऊन प्रस्ताव द्यावेत. त्याचप्रमाणे, वेळोवेळी पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
रुग्णवाहिकांची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातून यापूर्वी मानव विकास मिशन अंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यापूर्वी जिल्ह्यातून अकरा रूग्णवाहिकांची मागणी करण्यात आली आहे. मेळघाटात प्राधान्याने रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या बाबीचा शासनाकडे पाठपुरावाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले यांनी दिली.
राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या एक हजार रुग्णवाहिका टप्प्याटप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याचा शासनाकडून निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असून, यावर्षी पाचशे आणि पुढील वर्षी पाचशे अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्ती योग्य न राहिल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत. यावर्षी पाचशे नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी शासनाकडून ८९ कोटी ४८ लाख अंदाजित खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार राज्यात एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत.
या पाचशे नवीन रुग्णवाहिका राज्यातील २५३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १३७ ग्रामीण रुग्णालये, १०६ जिल्हा व उपजिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि चार प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार आहेत.