मुंबई, दि. 5 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. श्री.निलंगेकर हे सच्चे लोकनेते होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी शेतकरी व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी वेचले. राज्य विधानमंडळाचे सदस्य म्हणून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत तसेच मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी राज्याच्या प्रगती आणि विकासात बहुमोल योगदान दिले. निलंगेकर यांचे राज्याप्रती योगदान तसेच त्यांची सामान्य जनतेप्रती बांधिलकी निरंतर लोकांच्या स्मरणात राहील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.