मुंबई, दि. ५ : माजी मंत्री व २५ वर्ष नगर शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे अकस्मित निधन धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना थोरात म्हणाले की, गरीब कुटुंबातून आलेले अनिल भैय्या राठोड कायम तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जात असत. गरिबांप्रती त्यांची असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या बळावर सलग पंचवीस वर्ष अहमदनगर शहराचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. अनिल भैय्या हे सरळमार्गी होते. विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. सर्वसामान्य माणसांमध्ये अगदी सहजतेने ते वावरत असत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य माणसांशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांच्या निधनाने अहमदनगर शहर तर पोरके झाले आहे. त्यासोबतच एक समृद्ध राजकीय आणि सामाजिक जीवन जगणारा मित्रही आम्ही गमावला आहे.
अनिल भैय्या राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले.