‘वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला’
मुंबई, दि. ६:- वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचा सर्वेसर्वा असा प्रेरणादायी प्रवास पुण्यनगरी वृत्त समुहाचे संस्थापक -संपादक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे थांबला आहे. त्यांची मराठी वृत्तपत्र क्षेत्रातील वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, शिंगोटे बाबांकडे कष्टाळू वृत्ती होती. मुंबईत येऊन फळ विक्रेता, वृत्तपत्र विक्रेता अशी कष्टाची काम करतानाही त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र असावे, असा ध्यास घेतला. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचेही साक्षीदार होते. त्यांनी सर्वसामान्यांना समजेल आणि आवडेल अशा भाषेत वृत्तपत्र प्रकाशित करणे सुरु केले. त्यातूनच त्यांच्या वृत्तपत्र समुहाचा विस्तार झाला. मराठी सोबतच अन्य भाषांत दैनिक प्रकाशित करणारे ते एकमेव मराठी होते. त्यांची वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला. ज्येष्ठ संपादक मुरलीधर शिंगोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.