मुंबई, दि. ६ : दैनिक ‘पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीची हानी झाली आहे, अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
डॉ. शिंगणे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाबा शिंगोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी सात मार्च 1938 ला झाला होता. शिक्षण सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला वृत्तपत्र टाकण्याचे काम त्यांनी केले. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल, अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. सन 1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. त्यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.
त्यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीतील एक अध्याय समाप्त झाला आहे असेही डॉ. शिंगणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.