माजी आमदार शामराव पाटील (पानीवकर) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 7 :- ज्येष्ठ नेते, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार शामराव भीमराव पाटील (पानीवकर) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारं थोर व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, माजी आमदार शामराव पाटील हे दूरदृष्टीचे नेते होते. चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची कल्पकता त्यांच्याकडे होती. श्रीराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माळशिरसच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी काम केलं. तालुक्यातल्या सहकार क्षेत्राला बळ दिलं. माळशिरसच्या विकासासाठी त्यांनी केलेलं कार्य, दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे सुपुत्र श्री. प्रकाश पाटील आणि डॉ. सुनील  पाटील यांच्या, संपूर्ण पाटील पानीवकर कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. शामराव पाटील यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.