गरजूंना वन जमीन पट्टे मिळवून दिल्याचा आनंद वेगळाच – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा दि. ७ : वन जमीन पट्ट्यांच्या संदर्भात ४ हजार ५४४ अर्ज प्राप्त झाले असून ३ हजार ७१३ अपात्र ठरुन ८७३ अर्ज पात्र ठरविण्यात आले. साकोली तालुक्यातील १४ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात वन जमीन पट्टे वाटप करण्यात आले. गरजू लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे प्रदान करताना मनाला दिलासा मिळून आनंद झाल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली येथे वन जमीन पट्टे वितरण विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब टेळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे उपस्थित होते.

पुनर्विलोकनातून अपात्र लाभार्थ्यांना पात्र करण्याची कार्यवाही कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर करण्यात येणार आहे. ज्यांना अपात्र ठरविले त्यांना वन जमीन पट्टे मिळणार नाही अशी गैरसमजूत करु नये, असा दिलासा त्यांनी लाभार्थ्यांना दिला. याबाबत मार्चमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणार होती, परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे ते प्रलंबित राहीले. वन जमीन पट्टे धारकास भविष्यात सातबारा देण्यात येणार आहे. त्यामुळे या पट्ट्याचे लाभार्थी मालक होतील व सातबारावर त्याचे नाव येईल. तसेच कोणत्याही योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र राहून सुविधेचा लाभ घेतील, असेही ते म्हणाले. याबाबत काही अनुचित प्रकार आढळल्यास लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार करावी. वनहक्क कायद्यामध्ये त्यावेळी ज्यांची नोंद रजिस्टरवर आहे अशांचे नाव समितीकडे आहे. त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नोंद रजिस्टरची तपासणी सुद्धा करण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.

यावेळी मुक्ताबाई बोरकर, जगन्नाथ कोटांगले, सोमा मानकर, गंगुबाई लंजे, संपत गणवीर, हेमराज कऱ्हाडे, रुपचंद राऊत, संजय मडावी, एकनाथ चौधरी, सुखदेव कुंभरे, बाबुराव वरठे, चैतराम वाडीवा, श्रावण वाडीवा, देवानंद भलावी यांना विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते वन जमीन पट्टे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेसंबंधात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप वनसरक्षक विवेक होशिंग व तहसीलदार बाळासाहेब टेळे, साकोली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. जागेबाबत  वन व  महसूल विभागांनी विचार विमर्श करुन लवकरात लवकर तोडगा काढावा व सातबारानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी केल्या. या क्षेत्रातील लोकांच्या विकासासाठी कृषी महाविद्यालय हे महत्त्वाकांक्षी पाऊल ठरणार आहे. त्यानुषंगाने लवकरात लवकर नोटीफीकेशन करुन वन विभागाने जागा उपलबध करुन देण्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.