सातारा-सांगली सिंचन विभागाने समन्वय ठेवून कालव्यांना पाणी सोडावे

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

सातारा, दि. ७ : सातारा व सांगली जिल्ह्यातील सिंचन विभागांनी आपापसात समन्वय ठेवून प्रकल्पीय तरतुदीनुसार सातारा व सांगली जिल्ह्यातील कालव्यांना योग्य वेळी पाणी सोडावे, कोणत्याही लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सांगलीचे खासदार संजय पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. मिसाळ, कालवा सल्लागार समितीचे सदस्य अरुण लाड यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते.  

धरणाचे अतिरिक्त पाणी नदीत सोडण्याऐवजी माण-खटावकडे सोडण्यात यावे. त्या पाण्याची गणना त्यांना ठरवून दिलेल्या कोट्यामध्ये करु नये, असे सांगून पालकमंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले, १ सप्टेंबरपासून ठरवून दिल्याप्रमाणे सांगलीसाठी आवर्तन सुरु करावे. तसेच सातारा तालुक्यातील रखडलेल्या सिंचनाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे.

दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे, यापुढे असाच पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री श्री.पाटील पुढे म्हणाले, सातारा, सांगली जिल्ह्यातील कुठल्याही लाभ धारक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे आवर्तनाचे नियोजन करावे. प्रकल्पीय तरतुदीनुसार कोट्यानुसार प्रत्येक भागाला पाणी दिले जावे, असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेवटी सांगितले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.