भंडारा, दि. ७ : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने धान रोवणी केली असून पावसाच्या अनियमिततेमुळे धान जिवंत ठेवण्यासाठी कृषी पंपांना १२ तास वीज देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी वीज विभागाला दिल्या. याविषयी पालकमंत्र्यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असिम गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
भंडारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर गोडाऊन बांधकाम, पीक कर्ज वाटप व कृषी पंप वीज जोडणीचा आढावा पालकमंत्र्यांनी या बैठकीत घेतला. आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिपचंद्रन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी चंद्रकांत खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना बारा तास वीज उपलब्ध झाल्यास धानाचे पीक हातचे जाणार नाही असे नमूद करून पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा असून पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला बारा तास वीज पुरवठा आवश्यक आहे. यासाठीचे नियोजन महावितरणने तातडीने करावे, अशा सूचना त्यांनी महावितरणाला दिल्या.
धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात गोडाऊनची कमी असून मोठ्या प्रमाणात गोडाऊन उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना धान साठविणे सोईचे होईल. यासाठी बाजार समितीच्या गोडाऊनची दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविण्यात यावा. गोडाऊन बांधण्यासाठी शासकीय जमिनीचा शोध घेऊन प्रस्ताव तयार करण्यात यावा. तसेच सेवा सहकारी सोसायटीजवळ असलेल्या जागेवर गोडाऊन बांधकामाचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात शासकीय जागा उपलब्ध झाल्यास वखार महामंडळ गोडाऊन बांधण्यास इच्छूक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सर्व बाजार समित्यांच्या ठिकाणी वखार महामंडळास गोडाऊनसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी अहवाल तयार करावा असे ते म्हणाले. पुढील हंगामात जिल्ह्यातील धान भरडाईसाठी अन्य जिल्ह्यात जाता कामा नये असे ते म्हणाले.
या बैठकीत पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. खरीप हंगाम २०२०-२१ साठी जिल्ह्याला ४२६ कोटी २५ लाखाचे पिक कर्ज वितरणाचे उदिष्ट होते. ६ ऑगस्ट २०२० अखेर जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांनी ८२ हजार ८७८ खातेदारांना ४११ कोटी ६० लाखाचे पीक कर्ज वितरण केले. पीक कर्ज वितरणाची टक्केवारी ९७ टक्के आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११५ टक्के पीक कर्ज वितरण केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी बँकेचे कौतुक केले. राष्ट्रीयकृत बँकेने आपले उद्दीष्ट १७ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजना, खते व बियाणे आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
जिल्ह्यातील धानाच्या प्रत्यक्ष उत्पन्नाबाबत कृषी, महसूल व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या समिती मार्फत सर्व्हेक्षण करून उत्पन्न निश्चित करावे, असे पालकमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात मक्याची लागवड वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे असे ते म्हणाले.