मुंबई, दि. ७- आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरच्या वतीने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सेवेस सुरुवात करण्यात आली आहे. सुविधेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. या सुविधेमुळे ‘इज ऑफ डुईंग बिझनस’ला चालना मिळेल असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.
श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी डिजिटल स्वरुपात ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ची सुविधा देणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर ही राज्यातील पहिली औद्योगिक संघटना आहे. या माध्यमातून महाराष्ट्र चेंबरने डिजिटल क्षेत्रात दमदार पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करून कामकाज सुरू आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हा मोठा विजय आहे. या सुविधेमुळे वेळ, पैसा व श्रम वाचणार असून कार्यक्षमता वाढणार आहे. जन्माच्या दाखल्याप्रमाणे आयात-निर्यात क्षेत्रासाठी ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
कोरोना महामारीमुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ नुसार अर्थचक्र फिरले पाहिजे, त्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले. महापरवाना, महाजॉब, उद्योगमित्र, नवीन औद्योगिक क्षेत्राची निर्मिती आदी उपक्रम हाती घेतले आहेत. देश-विदेशी गुंतवणूक वाढीसाठी अनेक कंपन्यांसोबत सामजंस्य करार केले आहेत, असेही श्री. देसाई म्हणाले.
कोरोना काळात महाराष्ट्र चेंबर्सने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार-उद्योग सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन सेमिनार, चर्चासत्र घेतले. याच पार्श्वभूमीवर उद्योगांना ही सुविधा सुरू केली आहे. व्यापार उद्योग वाढवण्यासाठी चेंबर्स नेहमीच शासनासोबत कार्यरत राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.
या सुविधेमुळे राज्यातील कुठल्याही भागातून उद्योगांना सहजरित्या सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन घेता येईल. परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी सरकारची भूमिका नेहमीच सहकार्याची असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे नेहमीच सहकार्य करत असतात व व्यापार उद्योग वाढीसाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी चेंबरला सहकार्य करत असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर यांनी सांगितले.