पूरस्थितीचा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडून आढावा
इचलकरंजी, दि. ८ : गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर सांगली भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एकत्रित कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे भेट दिली. यावेळी दोघा मंत्रीद्वयांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थिती बाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
या दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला महापुराच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू नये त्याचबरोबर त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी व महाराष्ट्रचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही राज्यांकडून समन्वय राखला जात असून तो कायम रहावा असेही त्यांनी सांगितले. तसेच आवश्यक त्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना यावेळी सूचनाही देण्यात आल्या.
सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख धरणांमधून १.५६००० क्यूसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कर्नाटक मधील आलमट्टी या प्रमुख धरणांमधून २.२०००० क्युसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती या बैठकीमध्ये दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्किरे, बेळगावचे जिल्हाधिकारी आर.जे.हिरेमठ, बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, प्रांताधिकारी रविंद्र करलींग, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोजकुमार नाईक, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील, चिकोडीचे तहसीलदार एस. संपगावी, यांच्यासह प्रांताधिकारी विकास खरात, शिरोळ तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, पाटबंधारे विभागाचे अभियंता शिरीष पाटील, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील आदी उपस्थित होते.
महापुरासाठीच्या नियोजनाबाबत ८ जुलै २०२० रोजी मुंबई येथे महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यातील प्रमुख मंत्री यांची बैठक झाली होती. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी व दोन्ही राज्यांमधील पाटबंधारे विभागाचे अधिकारी व प्रमुख उच्चस्तरीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये २०१९ मध्ये आलेल्या महापुराचा आढावा व संभाव्य महापुराबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबतचे नियोजन निश्चित करण्यात आले होते.
००००