नागपूर पोलीसांची कामगिरी प्रशंसनीय – गृहमंत्री

नागपूर, दि. ८ :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम नागपूर शहर पोलीस उत्तम प्रकारे करीत आहेत. त्यासाठी पोलीस विभाग राबवत असलेल्या उपाययोजना आणि उपक्रम प्रशंसनीय आहेत, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केले.

नागपूर शहरांतर्गत कायदा व सुव्यवस्था, दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाई, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजना आदीबाबत श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयाच्या सभा कक्षात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रभारी सहआयुक्त निलेश भरणे, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) राकेश ओला, पोलीस उपायुक्त विनिता साहू, विवेक मसाळ, श्री. निलोत्पल, गजानन राजमाने, विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाच्या संकट कालावधीत जनजागृती करुन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या जबाबदारीसह वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची दुहेरी कामगिरी नागपूर शहर पोलीस पार पाडीत आहेत. पूर्वी शहराला ‘क्राईम कॅपिटल’ म्हणून संबोधले जात होते. परंतु आता पोलिसांच्या उत्तम कामगिरीमुळे ही प्रतिमा बदलली आहे. नागपूर शहर तसेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच लॉकडाऊन काळात शेल्टर होममधील नागरिकांची पोलीस विभागाने चांगली व्यवस्था केली. इतर राज्यातील नागरिकांना स्वगावी जाण्यासाठी रेल्वे तसेच बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. या काळात शहरातील कोणतीही गोरगरीब व्यक्ती उपाशी राहणार यासाठी पोलीसांनी कटाक्षाने लक्ष पुरविले.

सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून सायबर क्राईम, हॅकींग आदी प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरासाठी स्वतंत्र ‘सायबर पोलीस ठाणे’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्यामुळे सायबर प्रकरणांचा तपास सायबर पोलीस ठाण्यातूनच होईल. यामुळे सायबर गुन्हेगारीला निश्चितच चाप बसेल, असा विश्वास श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयामार्फत विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविले जातात. ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखेत प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये पोलीस स्टेशनमधील अभिलेखावरील असलेल्या सर्व गुन्हेगारांची तपासणी करण्यात येते. संशयित हालचाली किंवा सराईत असल्याचे आढळल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. ‘ऑपरेशन वाईप आऊट’अंतर्गत लपूनछपून अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द धाडसत्र राबविण्यात येते. ‘गुन्हेगार दत्तक योजना’ सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित असून येथील कर्मचारी नेमून दिलेल्या आरोपीची नियमित तपासणी करुन त्यांच्यावर पाळत ठेवतात.

नागपूर शहरात ‘स्मार्ट सीटी प्रोजेक्ट’अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामध्ये मुख्य चौकात फेस रिकगनेशन, नंबर रिकगनेशन कॅमेरे कार्यान्वित आहेत. या अंतर्गत ‘सी.ओ.सी. संपर्क पथका’मुळे शहरातील बरेच गुन्हे उघडकीस आले आहे. रात्रीच्या वेळेस महिलांना घरी जाण्यास साधन उपलब्ध नसल्याने फोनद्वारे नियंत्रण कक्षास माहिती मिळाल्यास ‘होम ड्रॉप’ योजनेद्वारे त्यांना तात्काळ वाहन पाठवून महिला पोलीसासह घरी सोडण्यात येते. तसेच ‘वुमन हेल्पलाईन’ क्रमांक 1091 / 0712-2561222 कार्यान्वित असून 24 तास सुरु आहे. तक्रारी आल्यास तात्काळ त्या ठिकाणी जावून कार्यवाही करण्यात येते. या योजनेचा महिलांना खुप फायदा होत आहे. तसेच ‘ऑपरेशन स्ट्रीट ड्राईव्ह’, ‘हिट स्कॉट’, ‘इंटेलिजन्स पथक’, ‘सराईत गुन्हेगारांचे डोजीयर्स’, ‘अंमली पदार्थ विरोध पथक’, ‘फरार पाहिजे आरोपी अटक पथक’, ‘छात्र पोलीस उपक्रम’, तसेच ‘स्टॅर्न्डड कम्युनिटी पोलीसींग स्कीम्स’ यासारखे उपक्रम शहर पोलिसांतर्फे राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे तसेच नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे खून, मालमत्ताविषयक तसेच महिला व मुलींच्या बाबतीतील गुन्ह्यात घट होत आहे, अशी माहिती श्री. उपाध्याय यांनी यावेळी दिली.

कोरोना संसर्गामुळे दगावलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान शेजुळ, तसचे पोलीस हवालदार सिध्दार्थ सहारे यांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.