यावेळी सरपंच सुनील सकट, सुरेखा गवळी, उपसरपंच प्रीती पठाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य दादाजी शेजवळ, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, गट शिक्षणाधिकारी एस.के.वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी निंबा निकम, सिन्झेंटा कंपनीचे रवींद्र पाटील, संजय पवार, टिळेकर, डॉ.भगवान कापसे, शिक्षक, व ग्रामपंचायतीचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. भुसे म्हणाले, गावातील शाळांचे कंपाऊंड, सुसज्ज वर्ग खोल्यांसह विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. त्याची आज पूर्तता होत असून या मागणीसाठी आग्रही विद्यार्थ्यांच्या हस्तेच आज भुमिपूजन करताना विशेष आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या तीनही शाळांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देताना कुठलीही वृक्षतोड न करता काम होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करताना श्री.भुसे म्हणाले, कंपनीना होणाऱ्या नफ्यातील काही भाग हा सामाजिक कार्यासाठी वापरणे शासनाच्या नियमानुसार बंधनकारक असून आज सिन्झेंटा कंपनीने तालुक्यातील तीन शाळांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्यांचा मी आभार व्यक्त करतो. जि.प.शाळांमध्ये गोरगरीबांची मुले शिकण्यासाठी येतात. यापुर्वी शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या परंतु आता शिक्षकांबद्दल चांगले अनुभव येत असून हा क्रांतीकारक बदल आज दिसून येतो.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीसाठी शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक व विद्यार्थी हे एक चांगले माध्यम आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक विषयावर निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे जनजागृती घडविता येवू शकते यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य
शिक्षकांच्या चांगल्या सेवेतून शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत आहे. शिक्षकांनी चांगली सेवा बजविण्यासाठी शिक्षकांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सोयीनुसार आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण आग्रही असून भारताचा चांगला नागरिक घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांकडे असून त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले. तर चालू आर्थिक वर्षात या माध्यमातून तालुक्यातील 25 नवीन शाळा बांधण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
पुढे बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, यापुढे कृषी विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यात युरियाचे नियोजन परिपूर्ण करण्यात आले असून गेल्या चार वर्षातील सरासरी वापरापेक्षा अधिक युरियाची मागणी दिसून येत आहे. यामध्ये अधिकच्या युरिया मागणीची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.