माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे दोशी वकील आर्ट्स कॉलेज येथील सभागृहात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे निसर्ग चक्रीवादळग्रस्त महाविद्यालयांना संगणक व इतर शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, माणगाव पंचायत समिती सभापती अलका जाधव, गोरेगाव सरपंच झुबेर अब्बासी, अशासकीय महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवारे, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संजय शेटे, प्रदीप सावंत, कोकण विभाग शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.डॉ.संजय जगताप, एनएसएसचे राज्य समन्वयक डॉ.अतुल साळुंखे, सौ.गीता पालरेचा, सौ.अरुणा शेठ, शांतीलाल मेथास, श्री.दिलीप शेठ, प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियंका कांबळे-आयरे उपस्थित होते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, रायगड जिल्ह्याचे सुरुवातीला करोना आणि नंतर निसर्ग चक्रीवादळाने खूप नुकसान केले. मात्र या संकट काळात खासदार शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटील तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांनी तत्परतेने केलेली मदत व मार्गदर्शन जिल्ह्यासाठी व संपूर्ण कोकणासाठी खूपच मोलाचे ठरले. या सर्वांप्रती ऋण व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, ही सुरुवात आहे. नजिकच्या काळात नुकसानग्रस्त सर्वच अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत शासनाकडून केली जाईल.
खासदार सुनील तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रथम खासदार शरद पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले. खासदार शरद पवार यांनी या वयातही करोनासारख्या संकटात चक्रीवादळानंतर लगेचच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. येथील परिस्थिती पाहून तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना येथील वस्तुस्थिती गंभीर असल्याचे व या भागासाठी मदतीचे निकष बदलून येथील जनतेला अधिकाधिक मदत देण्याविषयी अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्यामुळेच येथील नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आणि राबविण्यात आला.
ते पुढे म्हणाले, पुढील काळात ऑनलाइन शिक्षण ही बाब महत्त्वाची ठरणार आहे, या गोष्टीचा दूरदृष्टीने विचार करून खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी चक्रीवादळातील नुकसान झालेल्या 16 महाविद्यालयांना संगणक, प्रिंटर, फळा यासारख्या शैक्षणिक साहित्यासह सॅनिटायजिंग मशीन, पंखे, खुर्च्या, एलईडी बल्ब, ट्यूबलाइट, वॉटर कुलर, सीसीटीव्ही, प्रोजेक्टर यासारखी उपयुक्त साधन सामग्रीही देण्याचा निर्णय घेतला.
शेवटी लवकरच लोककलावंतांना तसेच नाट्यक्षेत्रातील पडद्यामागील कलाकारांना, तंत्रज्ञानाही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत केली जाणार असल्याचे सांगून खासदार सुनील तटकरे यांनी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे मनःपूर्वक आभार मानले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले की, कोकणातील विद्यार्थ्यांनी शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उल्लेखनीय बाजी मारली. त्यांच्या भविष्यातील शिक्षणाचा वेध घेत आजची ही मदत केली जात आहे.
कोकणातील पालकांनी, शिक्षणतज्ज्ञांनी केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून त्याबाबत काही सूचना असल्यास तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश परीक्षांबाबतच्या निर्णयाच्या दृष्टीने आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील काही सूचना असल्यास त्या राज्य शासनाकडे जरूर पाठवाव्यात, असे आवाहन करून खासदार सुप्रिया सुळे यांनी शेवटी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देताना नागरिकांनी सुरक्षितता बाळगून, काळजी घेऊनच गणेशोत्सव साजरा करण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कोकण निशानेमा ज्ञाती मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गुजर, प्रदीप गांधी व धर्मेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता रुपये पन्नास हजार तर प्रधानमंत्री सहायता निधीकरिता रुपये पन्नास हजार व शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र केलेले रुपये 7 हजार 500 ही रक्कम पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे व खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सुपूर्द केली.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक माजी आमदार सुरेश लाड यांनी केले, आभार डॉ.अतुल साळुंखे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत चांदोरकर यांनी केले. या कार्यक्रमास माणगाव तालुक्यातील अनेक मान्यवर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळग्रस्त महाविद्यालयातील शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.