आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – ॲड.यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांकडून जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा

अमरावती, दि. 9:  मेळघाटसह आदिवासी क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रमांना चालना देण्यात आली असून,आदिवासी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी  महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व इतरही भाग वनसंपदेने समृद्ध आहे. आदिवासी बांधवांनी कायम निसर्गाशी नाते जपले आहे. या समाजाला पराक्रम व त्यागाची मोठी परंपरा आहे. अमरावती जिल्ह्यात विशेषत: मेळघाटात विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचा प्रयत्न होत आहे. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्र) गावांच्या विकासासाठी अबंध निधी योजनेचा आठ कोटी 22 लाख रूपये निधी अमरावती जिल्ह्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. मेळघाटसह आदिवासी क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी ही तरतूद आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.  

विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जिल्ह्यात महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी सोलर चरखे युनिट ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र शासन प्रणित मिशन सोलर चरखाअंतर्गत धारणी तालुक्यात एक हजार सोलर चरखे व दोनशे सोलर लूम वाटप करण्याचे नियोजन आहे, तत्पूर्वीही महिला बचत गटांच्या माध्यमातून सोलर चरख्यावर सूत ते वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न होत असून, त्याचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

लॉकडाऊनच्या काळात अमरावती जिल्ह्यात रोजगारनिर्मितीसाठी विविध विकासकामांना चालना देण्यात आली. त्यात चिखलदरा व धारणी तालुक्यात विशेषत्वाने सर्वदूर रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. मनरेगातून रोजगारनिर्मितीच्या कामांमध्ये अमरावती जिल्हा आघाडीवर राहिला आहे. सामूहिक वन हक्क व्यवस्थापनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. आदिवासी भागात राज्य योजनेतून तसेच जिल्हा योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास, वृक्ष व फळबाग लागवड, वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण यासाठीही प्रयत्न होत आहेत. 

कुपोषणावर मात करण्यासाठी मेळघाटात आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांच्या समन्वयातून प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासह संपर्क साधने सर्वदूर उपलब्ध असावीत, म्हणून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला वेग देण्यात येत आहे. रस्ते विकास व इतर पायाभूत सुविधा परवानगीअभावी प्रलंबित राहू नये म्हणून विशेष पाठपुरावा होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना संक्रमणाचा कालावधी असला तरी आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना व सावधानता बाळगून या पोषण आहार व संबंधित योजनांच्या कामात खंड पडू दिला जाऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. मुले व स्तनदा मातांच्या सुदृढ आरोग्य व पोषणासाठी उपयुक्त असल्याने दूध भुकटीचे पॅकिंग करून अमृत आहार योजनेत मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आदिवासी समाजाचे वन तसेच वनक्षेत्र याबाबत दिलेले संविधानिक हक्क व अधिकाराची जपणूक करताना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना-उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्रांतिदिनानिमित्त शुभेच्छा

 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात 9 ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुक्तीचा लढा उभारणारा व स्वातंत्र्याची प्रेरणा हा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य अर्पण करणा-या थोरपुरूषांच्या त्यागाचे स्मरण करताना देशाप्रती नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याचीही जाणीव यानिमित्त ठेवूया व देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता चिरंतन ठेवण्याचा निर्धार आपण करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी आज जिल्ह्यातील नागरिकांना क्रांतिदिनाच्या शुभेच्छा देताना केले.

सद्य:स्थितीत उद्भवलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करत संयम व धैर्य राखून आणि सर्वप्रकारची दक्षता पाळून कोरोना संकट हद्दपार करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.