जागतिक आदिवासी गौरव दिन ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा

आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांचे मत

आदिवासींच्या हितासाठी आदिवासी हित संरक्षण कक्षाची व आरोग्यासाठी आदिवासी आरोग्य संवर्धन कक्षाची स्थापना करणार

नाशिक, दि. 9 ऑगस्ट: दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता आपण हा दिवस ऑनलाईन पध्दतीने साजरा करतोय. आदिवासी गौरव दिन साजरा करत असताना आदिवासी जमातीच्या वैचारिक जडण-घडणीसाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी हा दिवस ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘आदिवासी गौरव दिना’चा राज्यस्तरीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मंत्री ॲड. पाडवी बोलत होते. राज्यातील सर्व आदिवासी बांधवांना या दिनाच्या ऑनलाईन शुभेच्छा देत असताना आदिवासी विकास मंत्री. श्री. पाडवी बोलत होते. यावेळी आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, मुंबईहून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, तर प्रत्यक्ष नाशिकचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, आदिवासी अपर आयुक्त गिरीष सरोदे, व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील व्हिडीओ कॉन्फिरन्सिंगद्वारे तसेच प्रत्यक्ष उपस्थित होते.तसेच वेबकास्टद्वारे राज्यातील गावपातळीवर पाठविण्यात आलेल्या लिंकमुळे सुमारे दोन हजार आदिवासी बांधव यावेळी जोडले गेले होते.

xadivasi gaurav din nashik 11

आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी म्हणाले, बोगस आदिवासांना आळा घालण्यासाठी त्याचबरोबर या जमातीच्या उद्योगाला चालना देण्यासाठी ‘आदिवासी हित संरक्षण कक्षाची ’ स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल व इतर आजरांपासून आदिवासींचे रक्षण करण्यासाठी ‘आदिवासी आरोग्य संवर्धन कक्ष’ याची निर्मिती करण्यात येणार आहे. आदिवासींचा आणि निसर्गाचा खूप जवळचा संबंध असल्याने या जमातीसाठी निर्सगाशी संबंधित एक त्रैमासिक सुरु करावे असा विचार श्री. पाडवी यांनी बोलून दाखवला.

आदिवासी विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेच्या प्रवाहात आणण्यासाठी दिल्ली येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु करावे जेणेकरुन त्यांना स्पर्धा परिक्षेचे वातावरण अनुभवता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात यावे असेही मंत्री. श्री. पाडवी यांनी सांगितले. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊन मध्ये जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले त्या उपक्रमांचे मंत्री श्री. पाडवी यांनी कौतुक केले.

डीबीटीबाबत तज्ज्ञ कमिटीची नेमणूक करुन त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच आदिवासी जमातीचे रोख अर्थव्यवस्थेचे ज्ञान कमी असल्याने त्यांना योग्य दिशेने व सक्षम करण्यासाठी त्यांना स्वत:च्या पायावर सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक असून येणाऱ्या काळात कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वानी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी मंत्री श्री. के.सी.पाडवी यांनी केले.

धान खरेदीसाठी गोडाऊन विस्ताराने वाढविणे : उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

आदिवासींच्या विकासासाठी स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या क्रांतीवीरांना अभिवादन करण्यासाठी आदिवासी गौरव दिन साजरा केला जात असून आज कोरोनामुळे आदिवासी विभागाने राबविलेला हा ऑनलाईन उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. या दिनाचे औचित्य साधून येणाऱ्या काळात धान साठविण्यासाठी गोडावून विस्ताराने वाढवावीत तसेच आदिवासी सोसायट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वनपट्ट्याच्या जमिनी वाटप करण्याबरोबर त्यांचे सपाटीकरण करणे व इतर अनुषंगिक गोष्टीवर भर देण्यात यावा, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केल्या.

संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे आदिवासी युवकांमध्ये क्षमता बांधणी : पवनित कौर

पुणे येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण त्यासोबतच विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून आदिवासी युवकांमध्ये क्षमता बांधणी करण्यात येत असल्याचे मत, आयुक्त पवनित कौर यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊन काळात अभिनव प्रध्दतीने काम करणारे एकमेव विभाग: किरण कुलकर्णी

लॉकडाऊनच्या काळात अभिनव पध्दतीने काम करणारे महाराष्ट्रातील आदिवासी विभाग एकमेव विभाग असल्याचे मत, नाशिकचे आदिवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात करण्यात आलेल्या कामांचा अहवाल ई-कनेक्ट नावाने तयार करण्यात आला आहे. निश्चितच हा अहवाल संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास, श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते शिक्षणरथाचे उद्घाटन आणि अनलॉक लर्निंग शासकीय आश्रमशाळा, एकलव्य शाळा, वसतिगृह, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ क्लिप प्रोजेक्ट, रेडीओचा सांगाती या संवेदनशील उपक्रम, कनेक्ट रिपोर्ट प्रकाशन, यु-टयुब चॅनल/ई लर्निंग, ई-मॅगझिन इत्यादी उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर आयुक्त गिरीष सरोदे, सूत्रसंचालन सुचिता लासुरे व आभार प्रदर्शन नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी वसुमन पंत यांनी केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.