मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत
सांगली, दि. 9 : सांगली जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 कोटी 30 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढेही या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात सांगली जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भावाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 374 कोरोना बाधित रूग्ण उपचाराखाली आहेत. यातील 985 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली आहेत. त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी रूग्णालये अधिग्रहित करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी खाजगी रूग्णालयांनी आवश्यक ते सर्व सहकार्य द्यावे. सर्वांनी मिळून कोरोना बाधितांवर उपचार करूया व मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी खाजगी रूग्णांलयांना केले. यावेळी त्यांनी अनेक रूग्ण घाबरलेल्या स्थितीत असतात त्यामुळे ज्येष्ठ वैद्यकीय व्यवसायिकांनी त्यांच्यावर उपचार केल्यास, त्यांना धीर दिल्यास रूग्णांचे मनोधैर्य वाढेल व रूग्ण लवकरात लवकर बरा होण्यास त्याची मदत होईल. त्यामुळे संकटाच्या या वेळेत सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासन आणि खाजगी रूग्णालये यांच्यात सहजता यावी व सुसुत्रता यावी यासाठी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खाजगी रूग्णालयांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक रूग्ण बेड्स च्या शोधात फिरतात त्यामुळे उपचारासाठी उशीर होतो हे टाळून खाजगी रूग्णालयांच्या कार्यपध्दतीमध्ये सुसुत्रता यावी यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या बेड मॅनेजमेंट सिस्टीमला प्रतिसाद देऊन सर्वांनी ती वेळेत अद्ययावत ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत असलेला मनुष्यबळाचा तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या इंटर्नशिप करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सेवा उपलब्ध करून घ्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
या बैठकीत राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी अनेकदा खाजगी रूग्णालये आपली जबाबदारी झटकून रूग्णांना मोठ्या हॉस्पीटलच्या दिशेने पाठवितात. या ठिकाणी बेड्स उपलब्ध नसल्यास अडचणीचा प्रश्न येतो. हे टाळण्यासाठी आपल्याकडे येणाऱ्या रूग्णाला स्थितीचे गांभीर्य ओळखून प्राधान्याने उपचार सुरू करा, अशा सूचना खाजगी रूग्णालयांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात 80 टक्के आरोग्य सुविधा खाजगी क्षेत्रात आहेत. रूग्णांची वाढती संख्या पहाता खाजगी रूग्णालयांनी रूग्णसेवा देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. बेड्स उपलब्ध असतानाही रूग्णसेवा नाकारणे हे नैतिकता व कायदा या दोहोंना धरून नाही. गंभीर स्वरूपाच्या रूग्णांसाठी काही बेड्स राखीव ठेवावेत व रूग्णाला अन्यत्र न फिरवता तातडीने उपचार द्यावेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सूचीबध्द होण्यासाठी खाजगी रूग्णालयांनी स्वत:हून क्षमतावृद्धी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी मदत रूग्णालयांना प्रशासनामार्फत करण्यात येईल. याशिवाय अधिग्रहित खाजगी रूग्णालयांनी प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले.