जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. ९ : राज्यातील आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाचे मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी शुभेच्छा दिल्या. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दुर्गम भागाचे चित्र बदलून आदिवासी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. पाडवी म्हणाले की, राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक जडणघडणीत आदिवासी समाजाचे योगदान राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यातही लढवय्या आदिवासी बांधवांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या कार्याने इतिहासात नावे नोंदविली आहेत. राज्यातील नैसर्गिक संपदेचे रक्षण करण्यात आजही आदिवासी समाज आघाडीवर आहे.
रानावनात राहणारा आदिवासी आता मुख्य प्रवाहात येण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षणामुळे अनेक तरुण चांगल्या पदावर काम करत आहेत. आदिवासी समाजातील युवतीही आपल्या कर्तृत्वाने भरारी घेत आहेत, ही गौरवास्पद बाब आहे. याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आदिवासी समाजातील युवकांनी यशाची पताका रोवली आहे.
अजूनही दुर्गम भागातील आदिम समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहे. अशा समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.