रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
जळगाव,दि. 9 – रानभाज्या या निसर्गाची देण आहे. अनेक रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असून त्या पौष्टिक व जीवनसत्वयुक्त असल्याने कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या वरदान ठरणार असल्याने प्रत्येक नागरिकाने आठवड्यात किमान दोन वेळा या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोटरी क्लब, मायादेवी नगर, जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सावचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील या होत्या. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, रोटरीचे प्रकल्प प्रमुख रो. योगेश भोळे आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, आज ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन असून याच दिवशी रानभाजी महोत्सव होत असल्याने हा त्रिवेणी संगमाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे रानभाज्या टिकवून ठेवण्यात आदिवसी बांधवांचे मोलाचे योगदान आहे. हुतात्म्यांना अभिवादन करुन त्यांनी आदिवासी बांधवांनाही यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. आरोग्याच्यादृष्टीने रानभाज्यांना आहारात महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन आठवड्यातील एक दिवस शहरात रानभाज्यांचा बाजार भरविण्याच्या सूचनाही त्यांनी कृषि विभागास दिल्यात. त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या आहारात रानभाज्यांचा समावेश करावा याकरीता जनजागृती करावी. अशा कामांमध्ये रोटरी नेहमीच मदतीसाठी पुढे असल्याचे गौरोवोद्वारही पालकमंत्र्यांनी काढले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा कृषि व्यवसाय वाचला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगून यापुढे आठवड्यात दोन दिवस रानभाज्या खाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाकारी श्री. राऊत म्हणाले, जिल्ह्याला कृषीची चांगली परंपरा आहे. सातपुड्यातील भाज्यांना आहारात महत्त्वाचे स्थान आहे. हा वारसा व विविधता टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. नैसर्गिक भाज्यांचा आहारात वापर वाढावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आपल्याला नैसर्गिकतेकडे चला हा संदेशही नागरीकांपर्यंत पोहोचवायचा आहे. यासाठी कृषि विभाग, आत्मा व रोटरी क्लबचे महत्वपूर्ण योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी रानभाजी महोत्सव आयोजनामागील कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांची संकल्पना सांगून रानभाज्यांचे महत्व विशद केले. तर रोटरी योगेश भोळे यांनी रोटरी क्लबने गेल्या 27 वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच चांगल्या कामासाठी रोटरी क्लब नेहमीच मदतीसाठी पुढे असेल असेही सांगितले.
यावेळी उमेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या रानभाजी या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आहारतज्ज्ञ डॉ अनंत पाटील यांनी आहारात रानभाज्यांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. मनोजकुमार चोपडा यांनी रानभाज्यांचे औषधी उपयोग यावर सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरिता खाचणे व कावेरी राजपूत यांनी तर उपस्थितांचे आभार आत्माचे प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यातील 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. याठिकाणी रानभाज्या खरेदी करण्यासाठी जळगावकर नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.