आरोग्य विभागात मोठ्या संख्येने तात्पुरत्या नियुक्त्या

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

बीड, दि. ११ : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तपासणीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढविण्यात येणार असून हजारोंच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत करताना आरोग्य सेवकांच्या तात्पुरत्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. या सगळ्या प्रयत्नांमध्ये जिल्ह्यातील जनतेने या काळात प्रशासनास पूर्ण ताकदीने सहकार्य करणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अतिशय चांगले नियोजन करीत आहे. यासाठी जिल्हा पोलीस दलाचेही कार्य कौतुकास्पद असून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून जनतेने नियमांचे काटेकोर पालन करणे काळाची गरज आहे. दहा दिवसात पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने लॉकडाऊनच्या काळात कोविड-१९ ची साखळी तोडुन कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दीतुन कायमचा निरोप देण्याचा आपला मानस आहे, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

तसेच या संकटाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात होणाऱ्या भर्तीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री श्री.मुंडे यावेळी म्हणाले.

कोरोना चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी उत्कृष्ट जेवण आणि स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग लोकांच्या निष्काळजीपणामुळे वाढत आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास कार्यवाही केली जाईल. बाहेर गावी जाऊन आलेल्यांसाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था शहरात करण्याऐवजी शहराबाहेरील मंगल कार्यालय किंवा इतर इमारतीत केली जावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हा लॉकडाऊन जिल्ह्यासाठी शेवटचा असावा असा निर्धार करून कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दपार करू आणि या संकटाचे संधीत रुपांतर करू असे पालकमंत्री श्री.मुंडे यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. प्रकाश सोळुंके, आ. संदीप क्षीरसागर, जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार आदी शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कर्जवाटपाबाबत सूचनांप्रमाणे कर्जवाटप न केल्यास बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना यावेळी प्राधान्याने कर्जवाटप केले जावे. तसेच कर्जवाटप न केल्यास बँकांवर  गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. राज्यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त प्रमाणात कर्जमाफी मिळालेली आहे. आता नव्याने पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी सज्ज व्हावे आणि कुठलीही दिरंगाई न करता scale of finance  प्रमाणे कर्ज रक्क्म मंजूर करून तात्काळ कर्जाची रक्कम अदा करावी.

बॅंकांनी दर आठवड्यातील बुधवारचा संपूर्ण दिवस फक्त नव्याने पीक कर्ज अर्ज स्वीकारावे असे सांगून बँकांकडून शेतकऱ्यांना इतर कर्जांचे नाहरकत प्रमाणपत्र, कागदपत्रांची मागणी करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत पालकमंत्री श्री. मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध बॅक आणि शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.