अन्नधान्य वाटपाच्या सर्व योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याची दक्षता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घ्यावी

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

मुंबई, दि. ११ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, एपीएल शेतकरी योजना, मोफत तांदूळ, डाळ वाटपाची पंतप्रधान गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत योजना या योजनेचा सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.

राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी आज मंत्रालयातून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

श्री.भुजबळ म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात विभागाने चांगले काम केले आहे. स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. अन्नधान्य वाटपाच्या तक्रारीची दखल क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी लगेच घ्यावी. नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून चांगल्या दर्जाचे धान्य वाटप करावे खराब धान्याचे वाटप करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापुढे नागरिकांना धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु राहण्यासाठी काही अडचणी आल्या तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्या तत्काळ सोडवाव्यात. विभागीय अधिकाऱ्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या अन्न धान्य वाटपाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सतत प्रयत्न करतानाच नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये याची दक्षता घेण्याचेही निर्देश यावेळी श्री.भुजबळ यांनी दिले. लॉकडाऊन काळातील अन्नधान्य वाटपाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.