आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.१२ : राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत राज्य मराठी विकास संस्थेचे विविध प्रकल्प व उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अल्पावधीतच महाविद्यालयीन विद्यार्थी विश्वात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारी व नाट्याविष्काराच्या माध्यमातून मराठी भाषा व साहित्याचा वेध घेणारी रंगवैखरी ही नाट्याविष्कार स्पर्धा यंदा काही तांत्रिक कारणांमुळे व कोविडच्या पार्श्वभूमीवर आयोजित करणे शक्य झाले नसले तरी यापुढे ही स्पर्धा दरवर्षी नव्या जोमाने आयोजित करण्यात येणार आहे.
संस्थेने केलेल्या दासबोध, कृष्णाकाठ, कविता कुसुमाग्रजांची व कविता विंदांची या मराठीतल्या उत्तमोत्तम श्राव्य पुस्तकांना (बोलक्या पुस्तकांना) जगभरातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात घेता लवकरच या योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीस ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा यांचे मान्यवर कलावंतांकडून बोलक्या पुस्तकात रूपांतर करण्यात येणार आहे.
उत्तम संदर्भसाधनांच्या निर्मितीस अर्थसहाय्य करण्याच्या योजनेंतर्गत “सिंधुदुर्गातील रानभाज्या” या पुस्तकाला अर्थसाहाय्य करण्यात येणार असून वनस्पतीशास्त्र आणि मराठी भाषा यांचा अनोखा मिलाफ या पुस्तकातून वाचकांना पाहायला मिळणार असून सर्वसामान्य गृहिणी ते भाषेचे अभ्यासक या सर्वांना हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
महाराष्ट्रात नोकरीनिमित्ताने वास्तव्यास असलेल्या विविध आस्थापनांमधील अमराठी भाषकांना मराठीचे प्रशिक्षण देणारे वर्ग राज्य मराठी विकास संस्थेतर्फे घेतले जातात, त्यांची संख्या आता वाढवली जाणार आहे. महाराष्ट्रात सर्व शिक्षणमंडळातील अभ्यासक्रमांमध्ये आता मराठी अनिवार्य करण्यात आलेली आहे हे लक्षात घेता CBSC व ICSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा सुलभ संदर्भसाहित्याची निर्मिती राज्य मराठी विकास संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेतर्फे यापूर्वी राबविलेल्या “मायमराठी” या अमराठी भाषकांना उपयुक्त ठरलेल्या पाठ्यक्रमांसारखे नवनवीन उपक्रम याअंतर्गत साकारण्यात येणार आहेत.
मराठी भाषा-साहित्य-संस्कृती याविषयांवर काही दशकांपूर्वी मुंबई दूरदर्शनवरून प्रदर्शित झालेले व लोकांना आवडलेले विविध कार्यक्रम पुन्हा एकदा लोकांना पाहायला व अनुभवायला मिळावेत यासाठी मुंबई दूरदर्शनच्या सहकार्याने संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील ९ विद्यापीठांच्या सहकार्यांने महाराष्ट्रातील विविध लोककलांच्या डिजिटायजेशनचे काम सांस्कृतिक संचालनालयाने पूर्ण करत आणलेले आहे. ते सर्व सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने लोककला अभ्यासक, आस्वादक, नवीन पिढीतील कलावंत तसेच सर्वसामान्य जनतेसाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सनाच्या पुराभिलेख संचालनालयाने जवळपास १५ कोटी कागदपत्रांचे जतन करून ठेवले आहे. त्यातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, भाषिक व वाङ्मयीन घडामोडींचे लखलखते दर्शन देणारे मौलिक दस्तऐवज सांस्कृतिक संचालनालयांच्या सहकार्याने राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत.
मराठी साहित्यक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांपैकी निवडक साहित्यिकांच्या गावी अथवा जिथे त्यांची स्मारके आहेत अशा ठिकाणी भाषा-साहित्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस श्री. देसाई यांनी व्यक्त केला. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्यातून सार्वजनिक तसेच वैयक्तिक आरोग्य साक्षरता वाढण्यास साहाय्यभूत ठरेल अशा सुलभ साहित्याची निर्मिती सोप्या मराठीतून करण्यास प्राधान्य द्यावे असे मत श्री. देसाई यांनी मांडले.