आठवडा विशेष टीम―
व्हिजन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती, दि. १४ : समाजातील गोरगरीब व गरजू व्यक्तींना चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी रूग्णालयांनी प्रयत्न करावेत. विशेषत: आरोग्य तज्ज्ञांनी आपल्या सेवा शासकीय रूग्णालयातही दिल्यास गरीब व वंचित घटकांना त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
येथील वलगाव रोड स्थित व्हिजन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, रुग्णालयाचे डॉक्टर मोहसीन खान व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात चांगली रूग्णालये उभी राहताहेत, विविध तज्ज्ञ उपलब्ध होताहेत, ही समाधानाची बाब आहे. मात्र, त्यांची सेवा तळागाळातील नागरिकांनाही मिळाली पाहिजे. त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेनेही आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
कोरोना संकटकाळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे सर्व जोखीम पत्करून आघाडीवर लढत आहेत. या लढाईतील आरोग्य यंत्रणेचे योगदान अतुलनीय आहे, असेही त्यांनी सांगितले.
नेत्रोपचारासाठी जिल्ह्यात चांगल्या सुविधा निर्माण होण्यासाठी सुसज्ज आय बँकसह अत्याधुनिक यंत्रणा जिल्हा रूग्णालयाकडून उभारली जाणार आहे. त्यासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. निकम यांनी केले.