इरई नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १०० कोटी : पालकमंत्री वडेट्टीवार

आठवडा विशेष टीम―

पालकमंत्र्यांनी घेतला खनिज विकास निधी अंतर्गत कामांचा आढावा

चंद्रपूर, दि. १४ : जिल्हा खनिज प्रतिष्ठान, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत जिल्ह्यातील पूर्ण झालेली कामे व प्रस्तावित कामांची आढावा बैठक पार पडली. चंद्रपूर शहराची जीवनदाहीनी अशी ओळख असलेल्या इरई नदीच्या काठावर संरक्षक भिंत व नदीकाठच्या परिसरातील जागेवर सौंदर्यीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून १०० कोटी रुपये देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीस आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा खनिकर्म अधिकारी जी.डी.कांबळे, अपर संचालक वन अकादमी प्रशांत खाडे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यातील उर्वरित कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत अशा सूचना यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बफर झोन क्षेत्रातील तसेच बाधित क्षेत्रातील शाळांचा सर्व्हे करून शाळेतील वॉल कंपाऊंड बांधकाम तसेच शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना जिल्हा परिषदेला दिल्या.

खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रस्तावित कामांचा या बैठकीत विशेषत्वाने आढावा घेतला. प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी ६० टक्के तर प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी ४० टक्के  निधी देण्यात येतो. आतापर्यंत २७ यंत्रणांना निधी देण्यात आला आहे. यासोबतच जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्राप्त निधीचे नियोजन, मंजूर कामावरील खर्चाचे वर्गीकरण, शिल्लक निधीचा होऊ शकणारा क्षेत्रनिहाय खर्च, तालुकानिहाय प्राप्त व मंजूर निधी, यंत्रणा निहाय मंजूर व वितरीत निधी ची माहिती, यंत्रणा निहाय वितरित केलेल्या व झालेल्या खर्चाची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी जी. डी कांबळे यांनी दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.