नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

भंडारा, दि. १४ : कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असून नागरिकांना आरोग्यसुविधा तातडीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती घालवणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे व काळजी घेणे यामुळे आपण कोरोनावर नक्की मात करू असा विश्वास देतानाच नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्रधान्य द्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रशासन व यंत्रणेला दिल्या.

पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी व भंडारा येथील कोरोनाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, तहसीलदार मोहाडी डी. सी. बोंबर्डे, तुमसर तहसीलदार गजेंद्र बालपांडे, साकोली तहसीलदार बाळासाहेब टेळे, लाखांदूर तहसीलदार संतोष महल्ले, लाखनी तहसीलदार मलिक विराणी, आरोग्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी कोरोना व आरोग्याचा आढावा घेतला. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य असून कोरोनापासून मुक्ती हे ध्येय यंत्रणांनी ठेवावे असे ते म्हणाले. मृत्यू संख्या कमी ठेवण्याला प्राधान्य द्या. नागरिकांचे जीव महत्त्वाचे असून आरोग्य यंत्रणेने विनाविलंब आरोग्यसेवा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, खतासाठी कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घरकुल, रस्ते, खते, बियाणे, पाणी पुरवठा योजना व आरोग्य आदी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पीक कर्ज व कर्जमुक्तीबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. तुमसर येथील नेहरू विद्यालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी नगरपरिषद पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी सुद्धा चर्चा केली. नगरपरिषदचे विविध प्रश्न व समस्यांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. पाणी पुरवठा, स्वच्छता, घरकुल, रस्ते व कोविड आदी बाबत पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना अवगत केले.

साकोली तालुक्यात गावस्तरीय समित्या स्थापन करून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. काही गावांनी अतिशय उत्कृष्ट काम केल्याचे सांगण्यात आले. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, ज्या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट काम केले त्यांचे पत्र लिहून अभिनंदन करा. लाखनी तालुक्याचा आढावा तहसीलदारांनी सादर केला. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासोबतच जनजीवन सुरळीत होईल याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सध्या शेतीचा हंगाम असून पीक कर्ज व बी-बियाणे वाटपात कुठलीही अडचण येता काम नये असे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.