आठवडा विशेष टीम―
नागपूर, दि. 14: डॉक्टर, कोरोनायोद्धे आणि प्रशासकीय यंत्रणेने कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करणे, तसेच रिकव्हरी दर वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत. तसेच खासगी रुग्णालयांनी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करत शासनाला सूचना कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात शहरातील खासगी डॉक्टरांशी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
आमदार नागो गाणार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, मेडीकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. अजय केवलिया यांच्यासह नागपुरातील वैद्यकीय तज्ज्ञ, डॉक्टर उपस्थित होते.
मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि नियंत्रण मिळविण्यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. त्याची कारणे तपासून वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करा. कारण रुग्णालयात रुग्ण उशिरा पोहचत आहेत. त्यामुळे मृत्यूदर वाढत आहे. रुग्ण रुग्णालयात पुरेशा वेळेत उपचार घ्यायला आल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, असे पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले.
वैद्यकीय व्यवस्था केंद्रिभूत करणे आवश्यक असून, खासगी डॉक्टरांकडून महत्त्वपूर्ण सूचना मिळाव्यात आणि त्याचा उपयोग प्रशासकीय यंत्रणेला मृत्यूसंख्या नियंत्रित करण्यासाठी व्यवस्थापन करायला मदत व्हावी, यासाठी आवश्यक त्या सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच खासगी रुग्णालयात आलेला प्रत्येक रुग्ण कोवीड 19 असल्याचे समजून त्यांना कोरोनाची ॲण्टीजेन चाचणी करुन घेण्यासाठी समुपदेशन करावे. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचारासाठी वेळ लागणार नाही. परिणामी रुग्णालयात पोहोचून वेळेत उपचार मिळतील. तसेच रुग्णांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी रुग्णांवर सामाजिक बहिष्कार टाकू नये. यासाठी त्यांचे समुपदेशन करावे. तसेच डॉक्टरांनी कोरोना काळात मानवीय दृष्टिकोनातून उपचार करावेत, असेही ते म्हणाले.
मृत्यू दर कमी करण्यासाठी मोहल्ला, वार्डनिहाय कोविड नियंत्रण समिती गठीत करणे, घरोघरी सर्वेक्षण करणे, एन.जी.ओ.ची मदत घेणे, त्यांचे आवश्यक सहकार्य घ्यावे. खाजगी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना सेवा आणि बेड्स उपलब्ध करुन द्यावेत. यावेळी कोविडचे दिल्ली मॉडेल आणि न्यूझिलंड मॉडेलही राबविता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. चाचण्या, ट्रेसिंग आणि हॉस्पिटल्समध्ये बेड्स वाढविणे, प्लाझ्मा बँक सुदृढ करणे याबाबतही चर्चा करण्यात आली.
सामाजिक बहिष्कार टाळून मदत करा, धीर द्या
एखादा व्यक्ती पॉझीटीव्ह निघाल्यास तो स्वत: घाबरून जातो, घरातील सर्व व्यक्तींना त्याची काळजी वाटते आणि शेजारी त्याच्यावर बहिष्कार टाकू शकतात, असे व्हायला नको, ही वेळ कोणावरही येऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तीला मदत करा, योग्य सल्ला द्या आणि धीर देऊन तो बरा होईल, यादृष्टीने त्याला सहकार्य करा. हे करत असताना स्वत:ची काळजी घेऊन समुपदेशन करण्याचे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले.
नागरिकांनी रोग प्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) वाढविणे
प्रोटीनयुक्त आणि व्हिटामिन सी पदार्थांचे सेवन करणे, सकस आहार घेणे आणि व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणेहोमिओपथी औषध घेणे. कोरोना विषाणू प्रामुख्याने नाक, घसा आणि फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यासाठी नियमित वाफारे, गरम पाणी पिणे, थंड पदार्थ टाळणे आणि लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.