कोरोना फैलाव रोखण्याबाबत खबरदारी घ्या

आठवडा विशेष टीम―

अकोला, दि. १४ – सध्या सुरु असलेल्या पाऊस तसेच आगामी गणेशोत्सवासारखे सण या काळात कोरोनाचे संक्रमण होऊन फैलाव रोखण्याबाबत जिल्हा ते ग्राम पातळीवरील यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

दरम्यान अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर राज्यात सर्वाधिक म्हणजेच ८२.०९ असल्याबद्दल कडू यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यंत्रणेचे अभिनंदन केले. पालकमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. कुसुमाकर घोरपडे, मनपाचे डॉ. फारुख शेख तसेच अन्य विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

यावेळी कोरोना संक्रमण व उपचार याबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर दि. ९ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात ८२.०९ टक्के इतका असुन हा दर राज्यात सर्वाधिक आहे. याबद्दल यंत्रणेचे अभिनदंन केले. तथापि जिल्ह्यातील मृत्यूदर मात्र ४.१ टक्के इतका आहे, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेल्या चाचण्या, त्यातुन निदर्शनास येणारे रुग्ण याबाबतही स्थानिक अधिकाऱ्यांकडुन प्रतिसाद जाणुन घेण्यात आला.

यावेळी श्री. कडू म्हणाले, आता सणांचे दिवस येत आहेत. त्यामुळे यंत्रणांनी अधिक सर्तक रहावे. त्यासाठी किमान एक आठवडा आधी नियोजनबद्ध पुर्वतयारी करा. स्थानिक स्तरावर लक्षणे आढळलेल्या रुग्णांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करा. लक्षणे न दिसणाऱ्या मात्र अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरीच अलगीकरणाची सुविधा असल्यास त्यांना घरातच अलगीकरणात राहुन उपचार घेण्याची मुभा द्या. चाचण्या करताना अनेक लोकांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंच्या चाचण्या प्राधान्याने करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.