आठवडा विशेष टीम―
प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन अखेर मागे, सकारात्मक निर्णय घेण्यात येणार – पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन
चंद्रपूर ,दि. १४ : औष्णिक वीज केंद्राच्या चिमणी वर चढलेले ७ प्रकल्पग्रस्त १० दिवसांच्या आंदोलनानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खाली उतरले. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
सिटीपीएस विश्रामगृहावर ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांची लवकरच ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यामध्ये यासंदर्भात अंतिम तोडगा निघणार आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य अभियंता राजू घुगे, उपमुख्य अभियंता राजेश कुमार ओस्वाल, राजेश राजगडकर, ठाणेदार दिपक खोब्रागडे तसेच शिलवंत नांदेकर, प्रकाश देवतळे उपस्थित होते.