कोरोनाविरूद्धच्या लढाईतील तुम्हीच खरे सैनिक – ॲड.यशोमती ठाकूर

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. १५ : रूग्णसेवा हे सर्वात मोठे कार्य आहे. कोरोना संकटात निरंतर आरोग्य सेवा बजावत तुम्ही देशसेवेचे कार्य करत आहात. कोरोनाविरूद्धच्या लढाईतील तुम्हीच खरे सैनिक आहात, अशा शब्दात पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील जिल्हा कोविड रूग्णालयाच्या आपत्कालीन सेवा कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांच्यासह कोविड रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सेवारत कर्मचाऱ्यांच्या निवासी वसतिगृहाला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांनाही शुभेच्छा दिल्या.

कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार हे जीवाची जोखीम पत्करून रूग्णसेवा बजावत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, कोरोना महासंकटाच्या मुकाबल्यासाठी आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. कोरोनाची साथ लक्षात घेऊन अत्यंत अल्प कालावधीत जिल्हा कोविड रूग्णालय उभारून त्यानंतर शहरात इतरही ठिकाणी तसेच तालुक्यातही कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. स्थानिक स्तरावर चाचणी उपलब्धतेसाठी विद्यापीठात लॅबही सुरू करण्यात आली. आता डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळाही लवकरच सुरू होईल. यापुढेही सुविधांचा विस्तार करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात साथरोग नियंत्रण रूग्णालयेही उभारण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोविड रूग्णालयात कॅज्युअल्टी कक्षाची सुविधा उभारण्यात आली असून, तिथे सोळा खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन सुविधा व इतर सुविधाही तिथे देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले.

जिल्हा कारागृहाला भेट व पाहणी

बंदिजनांशी साधला संवाद; स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभाला अभिवादन

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी केली व बंदीजनांशी संवाद साधून तेथील सुविधांबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कारावास भोगाव्या लागलेल्या महापुरूषांच्या गौरवार्थ कारागृहात उभारण्यात आलेल्या स्तंभाला भेट देऊन अभिवादनही केले.

बंदीजनांसाठी कारागृह व्यवस्थापनाकडून चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोना संकटकाळात मास्कनिर्मितीच्या कामात मोठे योगदान मिळाले. आता गणेशमूर्तीसह विविध मूर्ती, फुलदाणी, विविध प्रकारचे फर्निचर बनविण्यात येत आहे. या उपक्रमांसह बंदीजनांचे कौशल्य जाणून त्याचा त्या उत्पादननिर्मितीत उपयोग करून घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी बंदीजनांतील कुशल कारागिरांनी निर्माण केलेल्या मूर्ती, फर्निचर आदी वस्तूंची पाहणी करून बंदीजनांना शुभेच्छा दिल्या. बंदीजनांसाठीच्या भोजनगृहालाही त्यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच कारागृहातील कम्युनिटी रेडियो, ग्रंथालय आदींचीही पाहणी केली.

यावेळी पालकमंत्र्यांनी महिला कारागृहालाही भेट देऊन तेथील महिला बंदीजनांच्या अडचणींबाबत जाणून घेतले. काही महिला बंदीजनांच्या मागणीनुसार त्यांना चित्रकलेचे साहित्य उपलब्ध करून त्यांच्या कौशल्यानुसार चांगली चित्रेही तयार करून घेतील ज्यांची कारागृहात तयार होणाऱ्या इतर वस्तूंप्रमाणे विक्री होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

कुशल कारागीर असलेल्या बंदीजनांकडून अनेक उपयुक्त वस्तूंची निर्मिती होते. त्यांच्या विपणनासाठी चांगला कॅटलॉग तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केली.

स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभाला अभिवादन

स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या महापुरूषांना कारावास भोगावा लागला. त्यातील अनेकजणांना अमरावती कारागृहात ठेवण्यात आले होते. या ठिकाणाला पालकमंत्र्यांनी भेट दिली. या ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांच्या गौरवार्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला पुष्पगुच्छ वाहून पालकमंत्र्यांनी अभिवादन केले.

अनेक महापुरूषांनी या देशासाठी घरादाराची पर्वा न करता कारावास भोगला. अनेकजण हुतात्मे झाले. त्यांच्या योगदानामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना पालकमंत्र्यांनी वंदन केले. प्रारंभी श्री. कांबळे यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.