लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल – यशोमती ठाकूर

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा

अमरावती, दि. 15 : स्वातंत्र्यानंतर गेल्या 72 वर्षांत देशाने ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात देदिप्यमान प्रगती केली. या देशातील विविध जातीधर्मातील बंधुभाव व एकता टिकवून, सर्वांना सोबत घेऊन महापुरूषांनी दिलेला लोकशाही मूल्यांचा वसा जपत आपल्याला पुढे जायचे आहे. यापूर्वी कुठलेही संकट आले असताना संपूर्ण देशाने एक होऊन त्याचा मुकाबला केला आहे. याच एकजुटीने आपण कोरोनाच्या महासंकटातूनही बाहेर पडू, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेऊन हा समारंभ उत्साहात पार पडला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, गेल्या सात दशकात ज्ञानविज्ञानाच्या विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी देशाने केली. अनेक महापुरूषांच्या त्याग, योगदान व दूरदृष्टीतून हा देश उभा राहिला आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांनी विविध क्षेत्रात अनेक ज्ञानमंदिरे उभारून आधुनिक भारताची पायाभरणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील समाजासाठी, स्त्री स्वातंत्र्यासाठी, कामगार बांधवांसाठी मोलाचे कार्य केले व न्याय, समता, बंधुता, एकता, एकात्मता या मूल्यांचा वसा राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला दिला. हा मूल्यांचा वसा जपून आपल्याला देश, राज्य पुढे न्यायचे आहे.

येथील माणसांच्या बंधुतेचे प्रत्यंतर कोरोनाच्या महासंकटातही आले. हिंदू- मुस्लिम बांधव या संकटात एकमेकांच्या मदतीला धावून आले. सामान्य माणसांना जोडून ठेवणारी ही ताकद संविधानाने दिली आहे. सबंध देशाला जोडून ठेवणारी ही वीण जपून विकासाकडे वाटचाल करण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक

प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढण्याची गरज पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, उद्योग क्षेत्रासह सर्वत्र महिलांचा सहभाग वाढणे गरजेचे असून, महिला व बालविकास विभाग त्यासाठी प्रयत्नरत आहे. देशात तरूणांची संख्या मोठी आहे. तरूणाईची ही ऊर्जा विधायक कार्याकडे वळवून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत औद्योगिकीकरण अधिक आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अधिक असली तरी, कोरोना प्रतिबंधासाठी जोखीम पत्करून सर्व यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. या यंत्रणेतील सर्व सहभागी व या लढाईत शासन-प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देणाऱ्या व्यक्ती, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था या सर्वांप्रती पालकमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कोरोना प्रतिबंधासाठी अत्यंत कमी कालावधीत उभारण्यात आलेले जिल्हा कोविड रुग्णालय, तालुका स्तरावरील कोविड रूग्णालय व हेल्थ सेंटर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथील लॅब, ठिकठिकाणी निर्माण झालेल्या ॲन्टिजेन टेस्ट सुविधा, जिल्ह्यात सातत्याने राबविण्यात येणा-या तपासणी मोहिमा आदींचा उल्लेख करून डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळाही लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोना संकटकाळात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. गरीब व वंचित बांधवांना अन्नधान्य वितरणाला सर्वदूर गती देण्यात आली. जिल्ह्यात सुमारे 25 लाख 47 हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला. गरजू व वंचित व्यक्तींना केवळ 5 रुपये दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात आली. स्थलांतरित प्रवासी नागरिकांसाठी निवारा केंद्रे,त्यांच्या प्रवासासाठी रेल्वे, वाहने उपलब्ध करुन देणे असे विविध उपाय करण्यात आले.

लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यात 690 गावांतून 3 हजार 120 विविध कामांना चालना मिळाली. प्रतिदिन मनुष्यबळ रोजगार निर्मिती 86 हजारावर पोहोचून मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर पोहोचला. राज्यात गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली. अमरावती जिल्ह्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी जीनची संख्या वाढविणे, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, सीसीआयचे नवे केंद्र सुरू होणे या उपायांमुळे कापूस खरेदीला वेग आला.

कर्जमुक्तीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली.कोरोनाच्या काळातही अडचणींवर मात करत तिची गतीने अंमलबजावणी होत आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम घेऊन जिल्ह्यात 2 लाख 69 हजार 706 खातेदारांना लाभ देण्यात आला. शेतकरी बांधवांना थेट बांधावर खत पुरवठा करण्यात आला. 19 हजार 248 मे.टन युरिया सर्वत्र उपलब्ध करुन देण्यात आला. शेतकरी ते थेट ग्राहक योजना, कृषी संजीवनी सप्ताह, रानभाज्या महोत्सव अशा उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आली.

मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी सुदृढ मेळघाट अभियान, नियमित घरपोच आहार पुरवठा आदींबाबत माहिती देऊन त्या म्हणाल्या की, कुपोषण ही शहरे व महानगराचीही समस्या असून, त्याच्या निर्मूलनासाठी भरीव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळावे म्हणून विविध आवास योजनांना गती देण्यात आली आहे. त्यातून प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संकटकाळातही विकासाची प्रक्रिया गतिमान झाली असताना कोरोनावर मात करुन पुन्हा नव्या दमाने झेप घेण्यासाठी या प्रयत्नांना आता सर्वांनी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

पीक कर्ज वितरणाला गती द्या

जिल्ह्यात पीक कर्ज वितरण उद्दिष्टानुसार पूर्ण झाली पाहिजे. त्यादृष्टीने वितरणाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अद्यापपर्यंत 627 कोटी 98 लाख रूपये पीक कर्ज वितरण झाल्याची माहिती लीड बँकेचे श्री. झा यांनी यावेळी दिली. कर्जवितरणाच्या या कामाला गती द्यावी. शेतकरी बांधवांची अडचण जाणून त्यांना कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करावे. खरीपासाठी शेतकरी बांधवांना कर्ज मिळावे यासाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेद्वारे अनेक शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. या पात्र शेतकरी बांधवांना कर्जवितरणाचा लाभही देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात वाळूच्या तस्करीबाबत तक्रारी येत असून, त्याबाबत कठोर कारवाई करून अशा प्रकारांना वेळीच आळा घालावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व महापालिका यांच्याकडून होत असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली व उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश दिले. कोविड रूग्णालयात ऑक्सिजन सुविधांची पुरेशी उपलब्धता करून देण्यात आली आहे. आवश्यक तिथे डबल ऑक्सिजन यंत्रणाही पुरविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.