आठवडा विशेष टीम―
पालघर दि. १५ : जिल्हा सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेचा जिल्हा असल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर नियोजनबद्ध पद्धतीने मात करुन प्रशासनाने विविध विकास कामांमध्ये आघाडी घेतली आहे. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरु आहे. पालघर जिल्ह्यात जी विकासकामे सुरू आहेत, ती पाहता लवकरच आपला जिल्हा राज्यात प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल यात शंका नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
१५ ऑगस्ट राष्ट्रीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालघर जिल्ह्याला असलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी वसई विरार महानगर पालिका क्षेत्रातील तसेच पालघर ग्रामीण भागातील कोविड संदर्भात असलेल्या सोईसुविधांचा उल्लेख करून आरोग्यविभागासोबतच काम करत असलेले महसूल विभाग, पोलीस दल, जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर यांचे महत्त्वाचे योगदान असून आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनामध्ये जे कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना शासनातर्फे साहाय्य दिले जाईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
खरीप हंगामात कृषी विभागाने ६७ हजार आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रती शेतकरी २५० ग्राम तुरीचे बियाणे मोफत वाटप करून त्याची पेरणी भाताच्या शेताच्या बांधावर करून घेतली आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना येणाऱ्या कालावधीत चांगल्या प्रतीची तूर उपलब्ध होईल. यामुळे त्यांच्या आहारात प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होऊन कुपोषण कमी होण्यास मदत होईल तसेच जिल्ह्यातील कुपोषण व बाल मृत्यू कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे आज कुपोषण व बालमृत्य कमी करण्यात यश आले आहे. शासनाने नुकतीच आदिवासी बहुल भागातील नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या परिस्थितीत विशेष मदत मिळण्यासाठी खावटी योजना मंजुर केली असून त्याचा जिल्ह्यामधील नागरिकांना फायदा होईल असा विश्वास यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस प्रशासनात प्रशंसनीय कामगीरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कोरोनामध्ये शहीद झालेल्या पोलीस पत्नीला पालकमंत्र्याच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधी मधून धनादेश सूपूर्द केला.
सदर प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे डहाणू येथील MRHRU या लॅबचे तसेच रिव्हेरा येथे ५० आय.सी.यु. बेड व ४० व्हेंटिलेटर असलेले डी.सी.एच सेंटरचे इ-उद्धाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक आणि डॉ. दयानंद सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतुन तयार झालेले “होम आयसोलेशन” या पुस्तकाचे अनावरण यावेळी करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्ष भारती कामडी, खा.राजेंद्र गावीत, आ.श्रीनिवास वनगा, आ.विनोद निकोले, जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे, नगराध्यक्षा उज्वला काळे, जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, अति.मु.का.चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक माणिक दिवे, तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.