वाशीम जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवा – वर्षा गायकवाड

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

 वाशिम जिल्हा शिक्षण विभागाचा आढावा

वाशिम, दि. १५ : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना विविध ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता दूरदर्शन, आकाशवाणी, यु-ट्यूब सारखी माध्यमे वापरली जात आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवावे, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या आढावा सभेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, महिला व बाल कल्याण सभापती शोभाताई गावंडे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती गायकवाड म्हणाल्या, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता शाळा सुरु करणे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे त्यांचे शैक्षणिक वर्ष सुद्धा वाया जाता कामा नये, यासाठी ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. ई-संवादाच्या माध्यमांचा प्रभावी वापर करून शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, दूरचित्रवाणी संच, रेडीओ उपलब्ध नसेल, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा.

विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणे शक्य नसले तरी शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशा गावामध्ये शिक्षकांनी स्वतःहून जाऊन ग्रामपंचायत सभागृह, मंदिर अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा. काही जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी पुढाकार घेऊन गावातील मुलांना शिक्षण देत आहेत. अशा प्रकारचे उपक्रम वाशिम जिल्ह्यातही राबविण्याबाबत प्रयत्न करावा. जिल्हा परिषदेने शिक्षक संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने याबाबत पुढाकार घ्यावा, अशा सूचना श्रीमती गायकवाड यांनी दिल्या. शिक्षण विभागातील रिक्त पदे, मोफत पाठ्यपुस्तक वितरण, आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया आदी विषयांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.