प्रशासकीयब्रेकिंग न्युज

गोंदिया: आरोग्य सेवेत तातडीने सुधारणा करा – पालकमंत्री अनिल देशमुख

आठवडा विशेष टीम―

कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा

गोंदिया,दि.15 : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आरोग्य यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करीत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेत तातडीने सुधारणा करा, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

आज 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा पालकमंत्री श्री देशमुख यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम कोरोटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री श्री देशमुख पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांची आरोग्य यंत्रणेने चांगली काळजी घ्यावी. त्यांना चांगला आहार दयावा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा. सर्व व्हेंटीलेटर्स चालु स्थितीत असावेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त ॲन्टीजन चाचण्या कराव्यात. मृत्यू दर वाढणार नाही यादृष्टीने विशेष काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिक, बालके, गर्भवती महिला यांच्याकडे विशेष लक्ष दयावे. एका बाधित कमीत कमी 20 चाचण्या झाल्या पाहिजे असे ते म्हणाले.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला 9 कोटी 17 लक्ष रुपये दिल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय स्त्री रुग्णालय, कोविड केअर सेंटर येथे कायम स्वच्छता राहील याकडे विशेष लक्ष दयावे. आरोग्य विभाग व महसूल विभागाकडे अधिकाऱ्यांसाठी काही वाहने नसल्यामुळे तसा प्रस्ताव दयावा. खनिकर्म प्रतिष्ठान निधीतून नविन वाहने खरेदीची कार्यवाही त्वरित करता येईल. भाजी बाजार व बाजारपेठेमध्ये कोरोनासंबंधी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे ते म्हणाले.

आमदार अग्रवाल म्हणाले, आरोग्य विभाग कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा देत नाही. स्वच्छता व भोजनाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. आरोग्य विभागाप्रती नागरिकांमध्ये गैरसोईबाबत रोष आहे. ज्या डॉक्टरांची ड्युटी आहे ते डॉक्टर कधीच ड्युटीवर दवाखान्यात आढळून येत नाही. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत. गोंदिया उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना वाहन नसल्याची बाब त्यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.

आमदार कोरोटे म्हणाले, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल दुर्गम भागातील सालेकसा तालुक्यातील दरेकसा आणि देवरी तालुक्यातील ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांना तेथून पुढे उपचारासाठी नेतांना अडचणी निर्माण होतात. देवरी ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था झाली असून तेथील स्वच्छतेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या, प्रयोगशाळा विषाणू चाचणी आणि रॅपिड ॲन्टीजन टेस्टच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने 1861 बेड उपलब्ध करुन देण्यात आले असून 13 क्वारंटाईन सेंटर आहे. ऑक्सीजन सपोर्टेड 412 बेड उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यासह कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देखील दिली.

पोलीस अधीक्षक श्री शिंदे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 24 तास नाकाबंदी करण्यात येत आहे. 2 अधिकारी आणि 14 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. प्रत्येक कंटेटमेन्ट झोनला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील नागरिकांना करण्यात येत असल्यांचे त्यांनी सांगितले.

गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री चव्हाण यांनी गोंदिया शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नियमित सॅनिटायझींग करण्यात येत असून स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. अग्नीशमन वाहनाच्या माध्यमातून संपूर्ण शहराचे सॅनिटायझींग करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी/मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी करण चव्हाण तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व नगरपालिका/नगरपंचायतचे मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.