सिंधुदुर्ग: पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे जिल्ह्यात सहकार व शैक्षणिक क्षेत्र वाढविण्यावर भर – पालकमंत्री उदय सामंत

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

सिंधुदुर्ग दि. 16 : सहकाराच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राने ज्याप्रमाणे प्रगती साधली त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार व शैक्षणिक क्षेत्र वाढविण्यावर भर देणार असून त्यातूनच जिल्ह्याची सर्वांगिण प्रगती साधण्यासाठी प्रयत्नशिल राहीन, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सांमत यांनी आज येथे केले.

भिरवंडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड भिरवंडे संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने अमृत महोत्सव व कार्यालय नुतनीकरण आणि सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि.प. सदस्य राजलक्ष्मी डिचवलकर, संजय आंग्रे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसिलदार आर.के. पवार, गट विकास अधिकारी मनोज भोसले, संदेश पारकर, अतुल रावराणे, विकास सोसायटीचे अध्यक्ष बेनी डिसोजा, उपाध्यक्ष मंगेश सावंत, बाळा भिसे, नागेंद्र परब आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, सहकारामध्ये विकासाची मोठी ताकद आहे. भिरवंडे गावाने सन 1944 साली विकासाचे रोपटे लावले. आज याच विकास सोसायटीमुळे गावाचा सर्वांगिण विकास झाला. त्याचबरोबर भिरवंडे गावाने अनेक राजकीय व्यक्ती या राज्याला दिले. सर्व प्रथम सहकार या गावाने जिल्ह्यात रुजवला आणि तो वाढविला यामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी आपला सहभाग नोंदविला पण ते हयात नाहीत अशा सर्वांना आदराजंली वाहतो. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, या संस्थेने 75 वर्षामध्ये प्रगती करुन दोन कोटी पर्यंत कर्ज वाटप केले आहे. आता हीच संस्था 100 वर्षात पर्दापण करताना 100 कोटीचे कर्ज वाटप करेल अशी आशा मी बाळगतो. राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन उत्कृष्ट काम करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू. जिल्ह्यात नवीन कामांपेक्षा प्रलंबित कामे पूर्ण करुन सिंधुदुर्गाचा कायापालट करु तसेच जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी पालकमंत्री म्हणून सदैव प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले, भिरवंडे गाव हे नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण कामे करण्यात अग्रेसर राहिले आहेत. या गावाचा माझ्याबरोबरच जिल्ह्याला सुद्धा अभिमान आहे. गावाने सहकार क्षेत्रात केलेली प्रगती व या गावाने दिलेली मोठमोठी व्यक्तीमत्वे ही या गावाची वैशिष्ट्य आहेत. भिरवंडे गाव नेहमीच प्रगती पथावर राहिले आहे. या गावाचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनी घेतला पाहिजे असे सांगून खासदार राऊत पुढे म्हणाले, ग्रामीण भागात राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना राबविण्यावर भर देणार असून अपुरे असलेले सिंचन प्रकल्‍प पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिलेले खावटी कर्ज माफ करण्यासाठी व नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, भिरवंडे विविध कार्यकारी सोसायटी 1944 साली सुरु झाली. त्यावेळी दोन लाख कर्ज वाटप करण्यात आले होते. आता या संस्थेने अमृत महोत्सव पर्दापण करताना दोन कोटी कर्ज वाटप केले आहे.

प्रारंभी भिरवंडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालय नुतनीकरणाचा कोनशिला अनावरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते संस्थेचे माजी चेअरमन, सदस्य आदर्श शेतकरी, नियमित कर्ज भरणारे सभासद, कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे कोरोना योद्धे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार सामंत यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष बेनी डिसोजा यांनी मांडले. यावेळी संस्थेचे आजी माजी सदस्य, सभासद, नागरिक उपस्थित होते.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.