सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी नशामुक्त भारत अभियान आवश्यक

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि. १६- नशामुक्त भारत अभियान हे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक अभियान असून मुंबई शहर जिल्ह्यात ते अत्यंत सक्षमतेने राबवण्यात येईल.ज्यायोगे समाज नशामुक्त होईल, असे प्रतिपादन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत देशातील २७२ जिल्ह्यांमध्ये या अभियानाची काल सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या अभियानाच्या ‘लोगो’चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. समाधान इंगळे व इतर उपस्थित होते.

या अभियानात असलेल्या मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व घटकांनी अत्यंत सक्षमतेने काम करून जिल्ह्यात हे अभियान यशस्वीपणे राबवावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी यावेळी दिल्या. जनजागृती मोहीम, रुग्णालय, पुनर्वसन केंद्र पाहणी, तेथील सोयीसुविधा उपचार पद्धती याची पाहणी करणे ही सर्व कामे नेमून दिलेल्या व्यक्ती, कार्यालये, सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावीत असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

राज्य व जिल्हास्तरीय समिती

या अभियानाच्या यशस्वितेसाठी राज्य व जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीत प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग हे अध्यक्ष तर संचालक, समाज कल्याण हे सदस्य सचिव आहेत. दर दोन महिन्यांनी या समितीची बैठक अपेक्षित आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये पोलीस आयुक्त /पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा स्तरावर काम करणारे नशामुक्ती मंडळ, सामाजिक संस्था हे सदस्य आहेत. दरमहा या समितीची एक बैठक अपेक्षित आहे.

१५ऑगस्ट 2020 ते ३१ मार्च 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम, उच्च शैक्षणिक संस्था, विद्यापीठ परिसर आणि शाळा यावर लक्ष केंद्रित करणे; अशा समुदायापर्यंत पोहोचणे. पुनर्वसन केंद्र, रुग्णालयांमध्ये सल्ला व उपचार सुविधांवर लक्ष केंद्रित करणे. असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.   

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.