नागपुरात कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे ‘जम्बो हॉस्पिटल’

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

एक हजार बेडची सुविधा; कोरोना रुग्णांना दिलासापालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती

नागपूर दि. 16 : विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे ‘जम्बो हॉस्पिटल’ मानकापूर येथे उभारण्यात येणार असून सुमारे एक हजार रुग्णांसाठी सुविधा येथे उपलब्ध होईल, अशी माहिती आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभा कक्षात नागपूर येथे ‘जम्बो कोविड हॉस्पिटल’साठी शहरातील योग्य जागा सुलभ होईल, यादृष्टीने  डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.

एएए हेल्थ कन्संटन्सी सर्विसेसचे डॉ.अहमद मेकलाई, डॉ.अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

विदर्भातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करणे तसेच शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची निर्मिती करण्यात येत आहे.’ जम्बो हॉस्पिटल’च्या निर्मितीमुळे कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वास डॉ.राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

कोवीड रुग्णांसाठी मुंबई तसेच पुणे येथे ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने शहरात देखील एक हजार रुग्णांसाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने राधास्वामी सत्संग (कळमेश्वर), शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची डॉ. राऊत यांनी माहिती घेतली. मानकापूर स्टेडियम  सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. 

****

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.