उदगीरसाठी कायमस्वरूपी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचा प्रस्ताव पाठविल्यास तात्काळ मंजूरी देणार – पालकमंत्री अमित देशमुख

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

कोविड-19 अंतर्गत उदगीर येथील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात

खाजगी रुग्णालयांनी रॅपिड टेस्ट किट्सचे शुल्क घेऊन त्यांच्याकडील रुग्णांची तपासणी करावी

लातूर शहराप्रमाणे उदगीर शहरात रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम राबवावी

लातूर, दि. 16 : उदगीर शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे उदगीर येथेच विषाणू संशोधन व निदान (RT-PCR) प्रयोगशाळा स्थापन करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागाने RT-PCR प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा. त्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

उदगीर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित उदगीर तालुका कोविड-19 आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, तहसीलदार वेंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, बसवराज पाटील नागराळकर, कल्याण पाटील व राजेश्वर निटुरे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की उदगीर तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 621 इतकी असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 34 आहे. उदगीर तालुक्याची मृत्यू दराची सरासरी ही लातूर जिल्ह्यापेक्षा अधिक आहे, त्यामुळे प्रशासनाने व आरोग्य यंत्रणेने मृत्यूदर कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रशासनाने कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्या व्यक्तींची स्वॅब तपासणी केली पाहिजे. उदगीर ग्रामीणपेक्षा उदगीर शहरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे त्यामुळे उदगीर नगर परिषदेने लातूर महापालिकेच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट किट द्वारे तपासणी मोहीम राबवावी. त्याकरिता आवश्यक असलेल्या किट्सची मागणी करून त्या त्वरित उपलब्ध कराव्यात. लॉकडाऊन कालावधित वसूल झालेल्या दंडाच्या रकमेतून नगरपरिषद या किट्स खरेदी करू शकते असे पालकमंत्री देशमुख यांनी सूचित केले.

तसेच खाजगी रुग्णालयांनी रॅपिड टेस्ट किट्सचे असलेले शुल्क संबंधित रुग्णांकडून घेऊन त्या रुग्णांची स्वॅब तपासणी त्यांच्या रुग्णालयातच करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही अधिक जागरूकता दाखवून स्वतःहून स्वॅब तपासणीसाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व टॉयलेट व बाथरूम नियमितपणे स्वच्छ ठेवले गेले पाहिजेत तसेच कोरोना च्या अनुषंगाने रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. रुग्णालय बद्दल कोणत्याही नागरिकांची तक्रार येणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. तसेच कोविड डायट नुसार बाधित रुग्णांना रोजच्या रोज वेळेत नियमित सकस आहार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे असेही त्यांनी सूचित केले.

उदगीर शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन एक्स-रे व इतर सर्व अनुषंगिक यंत्रणा अद्ययावत राहिली पाहिजे त्याकरता आरोग्य प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच येथील रुग्णालयात आवश्यक असलेले सर्व मनुष्यबळ जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिले.

उदगीर नगर परिषदेने 14 व्या वित्त आयोगा मधून रॅपिड टेस्ट किट्स खरेदी कराव्यात. तसेच उदगीर शहरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवावी अशा सूचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केली. तसेच तहसीलदार यांनी स्कूल बस ताब्यात घेऊन त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित कराव्यात व ग्रामीण व शहरी भागातून रुग्णवाहिकेची मागणी नोंदवली असता त्या तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात असेही त्यांनी निर्देशित केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी उदगीर शहर व उदगीर ग्रामीण भागात कोरोना च्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सद्यस्थितीमध्ये उदगीर तालुक्यात 135 कोरोना रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 452 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून बाधित रुग्णांपैकी 34 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी या बैठकीत देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून कोरोना रुग्णांची संख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले. तर मुख्याधिकारी भारत राठोड यांनी उदगीर नगर परिषदने 10 हजार रॅपिड अँटीजेन किट्सची मागणी केली असून दोन दिवसात उपलब्ध झाल्यास टेस्टची संख्या वाढविणार असल्याचे सांगितले.

यावेळी बसवराज पाटील नागराळकर, कल्याण पाटील व राजेश्वर निटूरे यांनी उदगीर शासकीय रुग्णालयातील अपुरे मनुष्यबळ, सिटीस्कॅन सुरु नसणे, रुग्णालयातील अस्वच्छता, रुग्णवाहिकांची उपलब्धता न होणे व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्वॅब तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.