वनउद्यानाचे वनमंत्र्यांनी केले ऑनलाईन उद्घाटन

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

सातारा , दि. १७ : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण (जि.सातारा) येथे वनविभागातर्फे उभारण्यात आलेल्या वनउद्यानाचे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन केले.

यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन उद्घाटन करतांना ते म्हणाले, या वनउद्यानात झाडांच्या स्थानिक प्रजाती, वनऔषधी, निसर्ग माहिती केंद्र, लहान मुलांसाठी बालोद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग पाथची निर्मिती करण्यात आली आहे. कमिन्स इंडीया फाऊंडेशनने त्यांच्या कंपनीच्या सीएसआर फंडमधून फलटण येथील वनउद्यान चालविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांनी सदर प्रस्ताव वनविभागाने मंजूर करावा, अशा सुचना केल्या. वनविभागानेसुध्दा हा प्रस्ताव त्वरीत मंजूर केला असून त्यानुसार या उद्यानाचा शुभारंभ करण्यात आल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड आणि पर्यावरण संरक्षण करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. फलटण येथील वनउद्यानात लावण्यात आलेले वटवृक्ष, पिंपळ, कडूनिंब, तुळस आदी झाडांपासून मानवाला 24 तास ऑक्सीजन मिळते. त्यामुळे अशी झाडे पर्यावरण संरक्षणासाठी वरदान ठरत असून जास्तीत जास्त प्रमाणात या झाडांची लागवड करावी. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कसोशीने प्रयत्न सुरु आहे. मात्र यात नागरिकांचेही सहकार्य मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रदुषण कमी करण्यास मदत होऊ शकेल.
कमिन्स इंडिया फाऊंडेशनसारख्या इतरही कंपन्यांनी पर्यावरण संरक्षाणसाठी पुढे यावे. या कंपन्याच्या सीएसआर फंडातून वनविभागाला आर्थिक मदत मिळाली तर या क्षेत्रात आणखी नवीन उपक्रम राबविता येतील. फलटण येथील वनउद्यानात कमिन्स इंडीया कंपनीकडून जी काही कामे करण्यात येतील, त्यात नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन वनमंत्र्यांनी केले.

या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. रामबाबू, यवतमाळ वनवृत्ताचे वनसंरक्ष श्री. निकम, यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, पुसदचे उपवनसंरक्षक अशोक सोनकुसरे आदी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.