आठवडा विशेष टीम―
भंडारा, दि. २० – राष्ट्रीय महामार्गावर साकोली सेंदुरवाफा शहराच्या वाहतुकीची अडचण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने मंजूर केलेल्या उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून सेंदुरवाफा येथे नागरिकांना सुरक्षितरित्या वाहतुकीकरिता सोईस्कर होईल असे महामार्गावर अंडरपास निर्माण करण्यात आले आहे. हे अंडरपास तोडण्यात यावे अशी सूचना प्राधिकरणाने बांधकाम करणाऱ्या कंपनीला दिली होती. सेंदुरवाफा येथील नागरिकांनी या संबंधाची तक्रार विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना केली होती.
नागरिकांच्या या मागणीची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सेंदुरवाफा येथे निर्माणाधीन उड्डाणपुलाला व अंडरपास मार्गाला भेट देऊन राष्ट्रीय प्राधिकरणाचे अधिकारी व जे एम सी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अंडरपास मार्ग पूर्ववत ठेवण्याचे निर्देश दिले. जेणेकरून नागरिकांना महामार्ग ओलांडताना कोणत्याही प्रकारची अडचण होता कामा नये. निर्माण कार्य करीत असताना नागरिकांच्या व मजूरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे निर्देश नाना पटोले यांनी कंपनी प्रबंधनाला दिले.
यावेळी बीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी व जे एम सी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.