प्रशासकीयब्रेकिंग न्युज

केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेतील यशस्वी उमेदवारांचा उद्या विधानमंडळातर्फे गौरव

आठवडा विशेष टीम―

मुंबई (प्रतिनिधी / वार्ताहर) – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेल्या “नागरी सेवा परीक्षा- २०१९” यामध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा गौरव समारंभ मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२० रोजी सायंकाळी ४.०० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सभापती, महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतीश  यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

 

बुध्दीमत्ता, ध्येय, एकाग्रता, अभ्यासूवृत्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या या गुणवंत विद्यार्थांचा गौरव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या संकल्पनेनुसार, महाराष्ट्र विधानमंडळातर्फे, प्रथमच करण्यात येत आहे. यावर्षी जवळपास ८० उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परिक्षेत सुयश प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विधानमंडळाकडून या यशस्वी उमेदवारांचा गौरव म्हणजे स्वजनाकडून त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली कौतुकाची दाद असून त्यांच्या भावी उज्ज्वल  कारकिर्दीकरिता शुभेच्छा आहेत. या कार्यक्रमासाठी यशस्वी उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले असून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक सूचनांचे पालन करण्यात येईल, अशी माहिती विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button