खाजगी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेत सहभागी व्हावे : चंद्रपूर पालकमंत्री

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

चंद्रपूर, दि. २९ : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या बघता कोरोना संक्रमण रोखण्यासाठी २० ते २५ खासगी डॉक्टरांना शासकीय रुग्णालयाची जोडून घ्यावे, तसेच जिल्ह्यात गुरांवर आलेल्या लंपी आजाराच्या नियंत्रणासाठी यंत्रणा बळकट करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडलेल्या बैठकीत कोरोनासह विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या काळात बाधितांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी २० ते  २५ डॉक्टरांची आवश्यकता असून खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या कार्यात जोडून घेण्याच्या तसेच त्यासंबंधी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एन. मोरे, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र खामगावकर,  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे आदींसह अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहेत. यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याच्या सूचना तसेच मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यासाठी पर्यायी व्यवस्था, ऑक्सिजन जनरेशन प्लांट लावण्यासंदर्भातील सूचना देखील यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.

जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केलेल्या असून ५० वर्षावरील नागरिकांचे घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे कार्य जिल्ह्यात सुरू केले आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांची देखील तपासणी जिल्ह्यात सुरू आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यासोबतच जिल्हा आरोग्य विभागामार्फत संक्षिप्त माहिती देणारी होम आयसोलेशन म्हणजेच गृह विलगीकरण ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यांचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका सर्वसामान्य नागरिकांसाठी अती महत्त्वाची ठरेल.

यासोबतच नगर विकास विभागांतर्गत चंद्रपूर तालुका तसेच ब्रह्मपुरी व सिदेंवाही नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी हद्दवाढ ही महत्त्वाची असून त्यासाठी मास्टर प्लान तयार करण्याच्या सूचना नगर विकास विभागाला दिल्या.

लम्पी हा आजार गाई व म्हशींमध्ये आढळणारा त्वचारोग असून याचा प्रादूर्भाव महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिली आहे. गावोगावी शिबिरे आयोजित करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात गोठे फवारणी सुद्धा करण्यात आली आहे. यासोबतच ७ तालुक्यातील ८२ हजार ९०० गावामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुद्धा करण्यात आले आहे. मनुष्यबळाअभावी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्राकरिता चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, सिंदेवाही या तालुक्यातील १४३ गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश केला असून त्याबाबत मास्टर प्लान तयार करण्यासंदर्भात वनविभागाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी निर्देश दिले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.