Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
नागपूर, दि. 30 : कोविडचा शहरातील वाढता संसर्ग पाहता कोविड नियंत्रणासाठी महानगरपालिकेला झोननिहाय सनदी अधिकारी देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले. विभागीय आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व मेडीकल, मेयोचे अधिष्ठाता उपस्थित होते.
सनदी अधिकारी दर्जाचा अधिकाऱ्यांसोबतच त्यामध्ये संबंधित मनपा झोनचा अधिकारी, प्रत्येक हॉस्पिटलचा एक प्रतिनिधी, वन विभागाचा एक अधिकारी आणि एनजीओचे दोन सदस्य अशी झोननिहाय समन्वय समिती गठित करुन त्याद्वारे कोविडचे संनियंत्रण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गठित झोननिहाय समन्वय समिती ही जिल्हा प्रशासन व हॉस्पिटलमध्ये संवाद व समन्वय ठेवेल तसेच कोविड हॉस्पिटलमध्ये देखील सरप्राईज चेक ठेवेल.
त्यानंतर वेबिनारद्वारे त्यांनी आज ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी, पत्रकार, सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्यांशीही संवाद साधला. वेबिनारमध्ये सहभागी सदस्यांच्या सूचनांची दखल पालकमंत्र्यांनी यावेळी घेतली.
खासदार विकास महात्मे यांनी केलेल्या रशिया व चीनमध्ये वैद्यकीय पदवी घेतलेल्या मात्र कोरोनामुळे घरी असलेल्या विद्यार्थ्यांच्या सेवा घेण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य व अन्य यांनी आयएलएस सर्वेक्षण, नागरिकांना योग्य माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा. फक्त प्रशासन पूर्ण प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील जबाबदारीने वागण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 60 टक्केच्या जवळपास आहे.
महानगरपालिकेने टेस्टिंग सेंटरची संख्या वाढवून क्षमता विकसित करावी. गंभीर रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे. मेडिकल व मेयोमध्ये पोस्ट कोविड सेंटर व नागरिकांच्या कोविड विषयाच्या प्रश्नासाठी व्यावसायिक पद्धतीने कॉल सेंटर लवकरच सुरु करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. मनपाच्या कंट्रोल रूम क्रमांकावर 0712-2567021 या क्रमांकाच्या 12 लाईन्स नागरीकांच्या शंकाचे निरसन करण्यास व संपर्कास उपलब्ध आहेत. पुढील साधारण दोन महिने नागपूरसाठी काळजीचे आहेत. पावसाळ्याच्या इतर आजारांसोबतच सारी, एन्फ्ल्युंजा आदी आजारांमुळे देखील प्रतिकार शक्ती कमी होऊन कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.