प्रशासकीयब्रेकिंग न्युज

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा वनपट्टेधारकांना लाभ मिळवून द्यावा

आठवडा विशेष टीम―

धुळे, दि. 31 : वनहक्क कायद्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या नागरिकांना वनपट्टे मिळाले आहेत, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि शिधापत्रिकांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले.

आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी आज धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, उपवनसंरक्षक श्री. भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळेचे प्रकल्प अधिकारी आर. एन. हाळपे आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. पाडवी म्हणाले, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागातर्फे खावटी अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा राज्यातील 11 लाख 55 हजार कुटुंबांना लाभ होणार आहे. या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार कराव्यात. तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका देण्यासाठी भरावयाचे शुल्क हे संबंधित प्रकल्प अधिकऱ्यांकडून न्यूक्लियस बजेट योजनेतून संबंधित यंत्रणेला अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शिधापत्रिकेसाठी पात्र कुटुंबांचा लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शोध घेत त्यांना शिधापत्रिका मिळवून द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी त्या भागात उपलब्ध होणारे अन्नधान्य जसे भगर, वरई, नाचणीचा आहारात वापर वाढवून कुपोषणाची तीव्रता कमी करावी. तसेच आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसायांचे सक्षमीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवावेत. ‘पेसा’अंतर्गत भरती करावयाच्या उमेदवारांमध्ये या क्षेत्रातील उमेदवार मिळाला नाही, तर संबंधित पद हे आरक्षित ठेवावे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतील धारावी येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर धुळे जिल्ह्यात ही उपक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने राबवावा.

वनपट्टे वितरीत करताना प्रमाणपत्रावरील क्षेत्र आणि प्रत्यक्ष क्षेत्र यात तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशाही सूचना मंत्री ॲड.पाडवी यांनी केली. या बैठकीत आदिवासी जमाती साठीच्या योजनांची अंमलजावणी, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम पोषण आहार योजना, रोजगार निर्मिती, खावटी अनुदान, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. आमदार श्री. पावरा, आमदार श्रीमती गावित, माजी आमदार डी. एस. अहिरे आदींनी विविध सूचना केल्या.

जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. प्रकल्प अधिकारी श्री. हाळपे यांनी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

00000

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.