आठवडा विशेष टीम―
- नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
- पवनी, लाखांदूर, तुमसर व मोहाडी तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट
- नागरिकांशी साधला संवाद
भंडारा, दि. ३१ : बचाव व मदतकार्याला प्राधान्य देऊन पूरात अडकलेल्या कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करावा व भविष्यात अशी आपत्ती उद्भवणार नाही यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी दिले. जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागाला भेट देऊन पालकमंत्र्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार नरेंद्र भोंडकर, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भरती, उपजिल्हाधिकारी संदीप भस्के, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पवनी तालुक्यातील मांगली गावाला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मांगली गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाले आहेत. बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या ठिकाणी भेट देऊन पालकमंत्र्यांनी नागरिकांशी चर्चा केली. ज्यांच्या घराचे नुकसान झाले त्यांना शासनातर्फे घर देण्यात येतील असे श्री. कदम यांनी सांगितले. पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांच्या कामाची पाहणी करून प्रशंसा केली. मांगली येथील नागरिकांची रस्त्याची मागणी पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
लाखांदूर तालुक्यातील ईटान गावाला पुराच्या पाण्याने वेढले असून ईटानचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. ईटान भागाची पाहणी करून पालकमंत्र्यांनी नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. ईटान गावातील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांना हवी असलेली सर्व मदत तातडीने देण्यात यावी असे पालकमंत्री म्हणाले.
विदर्भ सिंचन विश्रामगृह, पवनी येथे पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेशात अतिवृष्टी झाल्यामुळे अचानक पाणी वाढले. गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर पवनी तालुक्यातील मांगली या गावच्या पूरपरिस्थितीची पाहणी करून पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. लाखांदूर तालुक्यातील ईटान या गावाला भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी पूर परिस्थितीबाबतचा जिल्ह्याचा आढावा घेतला.