संकलन केंद्रावर गणेश मूर्ती सुपुर्द करण्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

नांदेड, दि. ३१ : गेली सहा महिने कोरोनाच्या अदृश्य प्रादुर्भावाशी लढत जनतेने आयुष्यभर जपलेल्या गणेशोत्सव, मोहरम-ताजिया, बुद्धपौर्णिमा, बकरी ईद सारखे सण उत्सव अतिशय संयमाने भक्ती भावाला जपत पार पाडले आहेत. जो विवेक जिल्ह्यातील जनतेने दाखविला आहे त्याच विवेकाच्या बळावर काळजी घेत दहा दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देऊयात. सद्य परिस्थिती आव्हानात्मक असून कोविड-१९ ची लस उपलब्ध होईपर्यंत सर्वजण अधिक कर्तव्य दक्षता बाळगतील, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

अनंत चतुर्थी निमित्त घरोघरी बसलेल्या गणपत्ती बाप्पाला निरोप देताना जिल्हा प्रशासनाला योग्य ती खबदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेच्या अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी लोकांना सुरक्षितरित्या आपल्या लाडक्या बाप्पाचे भक्तीभावपूर्ण विसर्जन करता यावे यासाठी स्वतंत्र केंद्राचीही निर्मिती केली आहे. या संकलन केंद्रावर जनतेने गणेश मूर्ती सुपुर्द कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या सर्वांच्या संयमी वागण्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करता येईल. ज्या पद्धतीने गेली सहा महिने जिल्ह्यातील जनता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करत आहेत त्याला तोड नसल्याचेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावर्षी सर्वदूर सर्वत्र चांगला पाऊस असल्यामुळे गोदावरी नदीही दुथडी भरुन वाहते आहे. तेथील पाण्याला प्रवाह आलेला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करुन जे नियोजन केले आहे त्याला सर्व जनता भक्ती भावाने साथ देईल याची खात्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा वनपट्टेधारकांना लाभ मिळवून द्यावा
Next post विमानतळ विकासकामे सहा महिन्यात पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे - ठाकूर