विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई मुख्य आणि ‘नीट’ परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ३१ : दिनांक १ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि दि.१३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य नाही. ही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला.

श्री. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये,अशी विनंती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केली आहे. ही विनंती त्यांनी तात्काळ मान्य करीत या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.

श्री. सामंत म्हणाले,या भागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला ही परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचणे अडचणीचे आहे.

याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना श्री. सामंत यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.