आठवडा विशेष टीम―
नांदेड दि. १ :- “वार्धक्याला झुगारून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शांत चित्ताने मुक्तीची वाट पाहिली. आयुष्यभर अध्यात्मासमवेत समाज सेवेचे व्रत त्यांनी बाळगले. लाखो भक्तांना त्यांनी विवेकाचा मार्ग दाखवित अंधश्रद्धेविरुद्ध जागर सुरु ठेवला. वास्तवाशी आणि सत्याच्या जवळ जाणारे त्यांचे बोल असल्याने त्यांच्या शब्दाला भक्तांनी प्रमाण मानले. सतत समाजाच्या भल्याचा विचार आपल्या कृतीतून चालू ठेवणारा एक दीप आता मालवला आहे” या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नांदेड येथील डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी हॉस्पिटला भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली होती. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या देहावसानामुळे सर्व भक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खाला सावरुन त्यांनी आयुष्यभर आपल्या कृतीतून दिलेला विवेकाचा जागर पुढे सुरु ठेवणे हिच खरी त्यांना श्रद्धांजली असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.