ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

आठवडा विशेष टीम―

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत मिळणार

चंद्रपूर दि.१ सप्टेंबर : ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, नगर परिषदेचे गटनेते विलास निखार, नगरसेवक नितीन ऊराडे, महेश भरे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, उपविभागीय अभियंता बांधकाम श्री.कुचनकर तसेच खेमराज तिडके, नानाजी तुपर प्रामुख्याने उपस्थित होते.

तालुक्यात आलेली पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला व योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्यात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासन आपल्या सोबत आहे. पूर परिस्थितीमध्ये आपणास सहकार्य करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे अशी हमी त्यांनी यावेळी दिली.

ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव, बेटाळा व किन्ही गावाला भेट देऊन शेती, पशूधन आणि मालमत्तेची झालेल्या अपरिमित हानीची पाहणी केली व गावातील रस्त्यांची स्थिती जाणून घेतली. कोरोना संसर्गाच्या काळात तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत गावागावात आरोग्य तपासणी कॅम्प लावण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. पुरग्रस्त भागातील नागरिकांना गावातील स्वच्छता व शुद्ध पिण्याचे पाणी नगर परिषदेमार्फत तसेच खाजगी टॅंकरद्वारे गावागावात पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही ना. वडेट्टीवार यांनी दिलेत.

ग्रामपंचायत व तलाठ्यांमार्फत गावातील पडझड झालेल्या घरांची तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, पंचनामे करताना कोणतेही घर सुटता कामा नये, अशा स्पष्ट सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी व सतर्कता बाळगावी अशा सूचना सुद्धा यावेळी केल्यात.

त्यासोबतच पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय शोध व बचाव पथकातील विजय गुनगुने, सुधाकर आत्राम, राहुल पाटील, राष्ट्रपाल नाईक, अनिल निकेसर, मिथुन मडावी, राजू निंबाळकर, राजू टेकाम तसेच चंद्रपूर पोलीस आपत्ती टीमचे अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते, वामन नाक्षीने, गिरीष मरापे, दिलीप चव्हाण समीर चापले विक्की खांडेकर, सुचित मोगरे, अजित बाहे, उमेश बनकर यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.