आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. २ : राज्यातील ज्येष्ठ नेते व औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या निधनामुळे ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले एक सर्वमान्य नेतृत्व हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
रामकृष्णबाबा पाटील यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ते एक अतिशय लोकप्रिय व समाजाच्या सर्वच घटकांमध्ये स्वीकारार्हता असलेले नेते होते. सरपंच पदापासून आमदार व खासदारकीपर्यंतच्या प्रवासातून त्यांची कर्तबगारी व लोकप्रियता स्पष्ट होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात त्यांच्याच रूपात काँग्रेसला दीर्घकाळानंतर यश मिळाले होते. राजकीय क्षेत्रासह सामाजिक व सहकार क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले. शेती आणि अध्यात्माकडे त्यांचा ओढा होता. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक अनुभवी मार्गदर्शक हरपल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.